आळेफाटा येथे लूटमार करणारे तिघे गजाआड | पुढारी

आळेफाटा येथे लूटमार करणारे तिघे गजाआड

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात लूटमार करणार्‍या तिघांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून लूटमारीतील ऐवज व कार, असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका परिसरात गुरुवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. शुभम भागाजी बुगे (वय 29, रा. बुगेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), सुशांत भास्कर राजदेव (वय 19, रा. काळेवाडी, सावरगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) आणि संकेत बाळासाहेब बोरुडे (वय 18, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल मूलचंद श्रीवास्तव (वय 30, रा. सांगनोरे, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आळेफाटा येथून पुण्याला जाण्यासाठी फिर्यादी राहुल श्रीवास्तव हे बसची वाट बघत होते. या वेळी त्यांच्याजवळ एक विनानंबरची कार आली. कारमध्ये चालकासह तिघे होते. चालकाने त्यांना ’कुठे जायचे?’ असे विचारले; त्यावर राहुल यांनी पुण्याला जायचे, असे सांगितले. चालकाने 200 रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांना कारमध्ये बसविले. चाळकवाडी टोलनाक्यावर कार आली असता कारमधील दोघांनी राहुल यांना लोखंडी रॉडने राहुल यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्याकडील 7 हजारांची रोकड, चांदीची अंगठी, हातामधील स्मार्टवॉच व एटीएम, पॅन कार्ड असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेत त्यांना रस्त्यावर सोडून पुढे ते तिघे निघून गेले.

राहुल यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी पोलिस पथकास तपासाच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आणे येथील जंगलातून कारसह तिघा आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लूटमार केलेला ऐवज आणि कार, असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपींपैकी शुभम बुगे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरीचे मुंबई, अहमदनगर येथे 5 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, अमित मालुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे आदी कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली

Back to top button