पुण्यातील एसटी स्थानकांची दुरवस्था; खड्डे, कचरा, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य | पुढारी

पुण्यातील एसटी स्थानकांची दुरवस्था; खड्डे, कचरा, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुठे मोठ-मोठे खड्डे, तर कुठे स्थानकाच्या भिंतींना पावसाळ्यातील गळतीमुळे बुरशी आलेली. कुठे छपराचे सिमेंट निखळलेले, तर कुठे कचर्‍याचे, घाणीचे, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य पसरलेले. अशी स्थिती आहे, पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे बसस्थानकाची. एसटी स्थानकामध्ये प्रवाशांना येणार्‍या समस्यांसंदर्भात दै.‘पुढारी’च्या वतीने गुरूवारी पुण्यातील तिन्ही एसटी स्थानकांमध्ये जाऊन पहाणी करण्यात आली. त्यावेळी विविध समस्या पहायला मिळाल्या. पूर्वीपेक्षा काही समस्या संपुष्टात आल्या असल्या तरी एसटी प्रशासनाला बारामती एसटी स्थानकाप्रमाणेच पुनर्विकासाच्या पुण्यातही ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे पहाणीदरम्यान समोर आले आहे.

स्वारगेट स्थानकाची स्थिती

  • मोठ-मोठे खड्डे. प्रवाशांना पावसाळ्यात येथून चालताना मोठी कसरत करावी लागते.
  • स्थानकाची इमारतीच्या छपराला बुरशी. परिणामी, स्लॅब तुटून पडण्याची शक्यता. यापूर्वी अशी घटना येथे घडली आहे.
  • स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्याखाली भटक्या कुत्र्यांचे ठाणे. स्थानकात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर. प्रवाशांसह चालकांनाही त्यांचा त्रास.

पुणे स्टेशन स्थानक स्थिती

  • स्थानक परिसरात कचरा, घाणीचे साम्राज्य.
  • स्थानक छपराच्या भिंतीचे सिमेंट प्लास्टर निघाले आहे. ते प्रवाशांच्या डोक्यात पडण्याची शक्यता.
  • स्थानक इमारतीची दुरवस्था.
  • स्लबला बुरशी हिरकणी कक्षाची खिडकी तुटलेली.
  • इमारतीच्या खिडक्यांचे दरवाजे तुटून पडायला लागले असून, लटकत आहेत. हे दरवाजे पडून अपघाताची शक्यता आहे.
  • बसस्थानकातून बाहेर पडताना रिक्षा, टॅक्सीवाल्यांची अडचण. परिणामी, परिसरात वाहतूक कोंडीची समस्या ठरलेली.

शिवाजीनगर स्थानकावरील स्थिती

  • स्थानकावर काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी साचले असून तेथे चिखल झाला आहे.
  • चिखलामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती. परिणामी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
  • स्थानकावर काही ठिकाणी तुटलेल्या, फुटलेल्या अडगळीच्या वस्तू ठेवल्या आहेत. त्यांचा प्रवाशांना अडथळा.
  • शिवाजीनगर स्थानकावर प्रवाशांकडून सर्रासपणे उघड्यावरच लघुशंका केली जाते.
  • स्थानकावर ठिकठिकाणी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, खराब टायरचे तुकडे, जुन्या चपला, कचरा पडलेला आहे.
  • स्थानकावरील पंखे बंद अवस्थेत असून, काही पंखे तुटलेले असल्याचे दिसत आहेत.
  • उघड्या स्वच्छतागृहामुळे त्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे.

मला अनेकदा एसटीने प्रवास करावा लागतो. लहानपणी एसटी स्थानकांवरून अनेकदा प्रवास करायचे. त्यावेळी स्थानके अजिबात घाण नसायची. स्थानकात आले की बसचा आवाज आणि इंधनाच्या धुराचा वेगळाच वास असायचा. आता त्या जोडीला दुर्गंधी, स्वच्छतागृहांमधील वास स्थानकावर पसरलेला असतो. यावर प्रशासनाने उपाययोजना करून, तातडीने स्वच्छतेकडे
लक्ष द्यावे.

– आनंद पाठक, प्रवासी

बसस्थानकावर बसायला सध्या भीती वाटते. कारण स्थानकांच्या छपराकडे पाहिल्यावर ते डोक्यात पडते की काय? अशी भीती वाटते. स्वच्छ अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसत नाही. ठिकठिकाणी कचरा, भटकी कुत्री दिसतात. स्थानकाच्या इमारतीही जुन्या झाल्या आहेत.

– कविता गायकवाड, प्रवासी

हेही वाचा

Back to top button