निरा नदी प्रदूषणाचा प्रश्न ‘जैसे थे’ ; नदीकाठच्या गावांना धोका | पुढारी

निरा नदी प्रदूषणाचा प्रश्न ‘जैसे थे’ ; नदीकाठच्या गावांना धोका

अनिल तावरे

सांगवी : निरा नदीच्या पाण्यात विविध प्रकल्पांचे रसायनमिश्रित सांडपाणी मिसळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाले आहे. गेल्या वर्षी निरा नदीच्या प्रदूषणाचा विषय मुंबईपासून दिल्लीपर्यंत पोहचला होता. हा विषय गेल्या वर्षी राजकीय नेत्यांसह प्रशासकीय पातळीवरील संबंधितांनी चांगलाच मनावर घेतला होता. त्यावेळी हा गंभीर प्रदूषणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे सर्वांनाच वाटत होते. परंतु, राजकीय घडामोडीत हा विषय पुन्हा मागे पडला आहे. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्यातील मंत्र्यांनी शेतकर्‍यांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडीत शेतकरी मात्र देशोधडीला लाग   ण्याची चिन्हे आहेत. या सर्व परिस्थितीत निरा नदी प्रदूषणाचा प्रश्न तसाच राहण्याची चिन्हे आहेत.

निरा नदीच्या चांगल्या पाण्यात फलटण व बारामती तालुक्यातील खासगी व सहकारी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाणी तसेच कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जात आहे. त्यामुळे शिरवली बंधार्‍यातील पाणी दुषित झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

वाढल्याने दुर्गंधी सुटून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
फलटण तालुक्यातील खासगी दूध प्रकल्प, साखर कारखाना, कत्तलखाना, नगरपरिषद आदींचे रसायन व रक्तमिश्रित सांडपाणी शिरवली बंधार्‍याच्या पाणलोट क्षेत्रात मिसळून प्रदूषण वाढले आहे. शिरवली बंधार्‍याला मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने तेच प्रदुषित पाणी खालच्या निरावागज बंधार्‍यात मिसळून त्याचेही प्रदूषण वाढले आहे. निरावागज बंधार्‍यात शिरवली बंधार्‍यातील दुषित पाणी तसेच माळेगाव कारखान्याचे सांडपाणी मिसळत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

गेल्या वर्षी बारामती टार्गेट करताना राज्य व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व राजकीय मंडळींनी निरा नदीच्या प्रदूषणाचा विषय मनावर घेतला होता. परंतु, जुलै महिन्यात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीत निरा नदी प्रदूषणाची विषय अडगळीत पडल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

 

Back to top button