पन्नास लाखांचा निधी तरीही राजगडावरील राजसदरेच्या डागडुजीकडे दुर्लक्ष | पुढारी

पन्नास लाखांचा निधी तरीही राजगडावरील राजसदरेच्या डागडुजीकडे दुर्लक्ष

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  राजगड किल्ल्याची डागडुजी, विकासासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार 25 वर्षांहून अधिक काळ जेथून पहिला त्या राजगड किल्ल्याच्या पद्मावती माचीवरील राजसदरेच्या डागडुजीकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. राजसदरेच्या डागडुजीसाठी पुणे महापालिकेने पन्नास लाख रुपयांचा निधी दिला होता. निधी कमी पडत असल्याने पुरातत्व खात्यानेही राजसदरेच्या उभारणीसाठी खर्च केला होता. मात्र, 2016 पासून राजसदरेच्या डागडुजीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. राजसदरेच्या आतील सभागृहात फरशी नसल्याने मुरुम -मातीचे थर पडून आहेत. त्यामुळे शिवभक्त, पर्यटकांची गैरसोय होत आहे.

शिवजयंती तसेच इतर सण उत्सवासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त राजसदरेत येतात. राजसदरेच्या बाहेरील आवारात शिवकालीन बांधकाम शैलीत दगडी फरशी बसवण्यात आली आहे. तशाच दगडी फरशा राजसदरेच्या आतील सभागृहात बसविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबत पुरातत्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या राजसदरेची पाहणी करून आतील सभागृहात फरशी बसवणे तसेच आवश्यक डागडुजीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

राजसदरेवर तळघर
सन 1997 मध्ये राजसदरेची डागडुजी करताना राजसदरेतील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाखाली तळघर सापडले होते. स्वराज्याच्या मोहिमांच्या मसलती. गुप्त बैठका या तळघरात होत असत. तळघराचे काम दर्जेदार असून अद्यापही सुस्थितीत आहे.

बालेकिल्ल्यावरील राजसदर दुर्लक्षित
पद्मावती माचीप्रमाणे राजगडाच्या बालेकिल्ल्यावरही शिवरायांची राजसदर होती. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा राजवाडा, राजमाता जिजाऊ यांच्या निवासस्थानी राणीमहल आदी वास्तू तसेच राजसदरेचे भग्न अवशेष शिल्लक आहेत. अर्धवट अवस्थेत भिंती आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या वास्तूंचे जतन करण्यात यावे, अशी मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली आहे.

Back to top button