दौंड येथील समस्या सोडविण्याबाबत रेल्वेमंत्री सकारात्मक | पुढारी

दौंड येथील समस्या सोडविण्याबाबत रेल्वेमंत्री सकारात्मक

दौंड : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे भेट घेऊन दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर चर्चा केली तसेच विविध मागण्यांची निवेदने दिली. येथील रेल्वेबाबत असलेल्या समस्या सोडविण्याबाबत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली. आ. कुल यांनी मांडलेल्या प्रमुख विषयांमध्ये दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंडदरम्यान लोकल सेवा सुरू करावी, दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद गतीने सुरू करण्यात यावे, खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा, कडेठाण व कानगाव येथे सुरू असलेल्या ठणइ चा कामाच्या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत यांचा समावेश आहे.

यासह दौंड-पुणे मार्गादरम्यान मेमू ट्रिपची वारंवारता वाढवावी, दौंड-हडपसर डेमू विशेष गाडी पुण्यापर्यंत चालवावी, हडपसर-सोलापूर डेमू एक्स्प्रेसला मांजरी, यवत, खुटबाव, कडेठाण आणि पाटस स्थानकांवर थांबा मंजूर करावा, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी)-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड जंक्शन येथे थांबा देण्यात यावा, दौंड-पुणे दरम्यान धावणार्‍या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत, एमजीआर चेन्नई सेंट्रल एसएफ एक्सप्रेस, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोईम्बतूर एक्सप्रेस, सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, विशाखापट्टणम एक्सप्रेस, कराईकल साप्ताहिक एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस, होसापेटे एसएफ एक्सप्रेस, यशवंतपूर एसी एक्सप्रेस, चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस आदी सुपर फास्ट लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा द्यावा या मागण्या करण्यात आल्या.

वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे-दौंड रेल्वे ट्रॅकचे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळीच्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणीमध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसरच्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी अशी देखील मागणी करण्यात आली. याप्रसंगी माढाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

 

Back to top button