Pune : ‘स्वच्छ’च्या नावाखाली तिजोरी साफ करण्याचा डाव? | पुढारी

Pune : ‘स्वच्छ’च्या नावाखाली तिजोरी साफ करण्याचा डाव?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘स्वच्छ भारत’ अभियान स्पर्धेत पुणे शहराचा नंबर येण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले, तरी सध्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी (टिपिंग) दिली जात असलेली प्रतिटन 600 रुपये फी ही 875 रुपये देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे शहर स्वच्छ करण्याच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी साफ करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
शहरातील बहुतांश कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये ओल्या कचर्‍यासोबतच मिक्स कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते.

या प्रकल्पांना सरासरी 600 रुपये प्रतिटन दराप्रमाणे कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी टिपिंग फी देण्यात येते. असे असताना शहरात निर्माण होणार्‍या अतिरिक्त 150 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो सिमेंट कंपन्या व अन्य उद्योगांना इंधन म्हणून पुरविण्यासाठीची ही निविदा होती. या निविदेमध्ये एका कंपनीची 875 रुपये प्रतिटन टिपिंग फीची निविदा सर्वात कमी दराने आली आहे.

यापूर्वीदेखील शहराबाहेर कचरा वाहून नेण्याच्या नावाखाली तो लगतच्या गावामध्ये साठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे खरोखरच अधिकचे पैसे देऊन सिमेंट कंपन्या किंवा अन्य उद्योगांमध्ये इंधनासाठी हा कचरा जाणार का? किंवा लगतच्या गावांमध्ये तो साठविला जाणार? असे प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button