Lok Sabha election : पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, साेमवारी देशात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान | पुढारी

Lok Sabha election : पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, साेमवारी देशात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी धडधडत असलेल्या प्रचारतोफा आज (दि. १८) सायंकाळी थंडावल्या. देशभरातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ मतदारसंघांमध्ये सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानातून काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल, स्मृती इराणी, कपिल पाटील, भारती पवार यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला नशीब आजमावत आहेत.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांमध्ये होणार मतदान

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांसह उत्तर प्रदेश १४, बिहार ५, पश्चिम बंगाल ७, झारखंड ३, ओडिशा ५, जम्मू आणि काश्मीर १, लडाख १ अशा एकूण ४९ मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उत्तर, उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व, उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या १३ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या सर्वच ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्षांनी प्रचारात चांगलाच जोर लावल्याचे बघायला मिळाले आहे.

मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीने शुक्रवारी जाहीर सभांचा धडाका लावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संयुक्त सभा घेतली.

महाविकास आघाडीने घेतलेल्या जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहभाग घेऊन वातावरण तापविले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी रोड शो, कॉर्नर सभा आणि रॅलींचे आयोजन करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशमध्‍ये दिग्‍गजांचे भवितव्‍य होणार ‘ईव्‍हीएम’मध्‍ये बंद

उत्तरप्रदेशातील रायबरेलीत राहुल गांधी यांचा सामना भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी आहे. अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांची लढत काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांच्याशी आहे. लखनौमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यापुढे सपाचे रविदास मेहरोत्रा यांचे आव्हान आहे.

कैसरगंजमध्ये वादग्रस्त खासदार ब्रूजभूषण सिंह यांचे पुत्र करणभूषण सिंह मैदानात आहेत. त्यांची लढत सपाचे राम भगत मिश्रा आणि बसपाचे नरेंद्र पांडे यांच्याशी आहे. बिहारच्या सारण मतदारसंघात राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांच्याशी आहे.

महाराष्ट्रात मुंबई उत्तरमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची टक्कर काँग्रेसचे भूषण पाटील यांच्याशी आहे. मुंबई उत्तर – मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यापुढे भाजपचे उज्वल निकम यांचे आव्हान आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांची लढत पीडीपीचे फैयाज अहमद मीर यांच्याशी आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार

काँग्रेस नेते राहुल गांधी- रायबरेली (उत्तर प्रदेश)
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह- लखनऊ (उत्तर प्रदेश)
केंद्रीय मंत्री पियुष गोयल- मुंबई उत्तर (महाराष्ट्र)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी- अमेठी (उत्तर प्रदेश)
नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला- बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर)

 

Back to top button