..त्यांना घरी बसण्यात इंटरेस्ट : देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका | पुढारी

..त्यांना घरी बसण्यात इंटरेस्ट : देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामध्ये काही लोक घरी बसवायचे. काम करणार्‍यांना पण घरी बसवायचे. इतर राज्याने त्या काळात कामे करून घेतली, पण त्या वेळच्या नेतृत्वाला घरी बसण्यात इंटरेस्ट होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारकडून पुण्यात अनेक विकास योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे. कॅन्टोन्मेंटचा भाग असल्याने अडचणी येतात. महापालिकेला जीएसटीचा परतावा मिळतो. तसा कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटीचा निधी दिला जावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी मी आता स्वतः पाठपुरावा करणार आहे. रेल्वेच्या जमिनीवर झोपडपट्टीला अडचणी सगळीकडे आहेत, त्यांना नोटीसा घ्याव्या लागतात, रेल्वे ज्या जमिनी वापरणार नाहीत, त्या एसआरएला दिल्या तर राज्यसरकार त्या विकसित करून आम्ही घर देऊ. केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. नोटीसा आल्या तर घाबरू नका, हा प्रश्न सोडवला जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

पाटील म्हणाले, गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून, राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे. लहुजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती व पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्त्वपूर्ण असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात प्रयोग सुरू

पुण्यात एक प्रयोग करण्यात येत आहे. हिंजवडीमध्ये मेट्रोपासून कंपनीपर्यंत जाण्यासाठी स्कायबसचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाल्या आहेत. यामुळे प्रदुषणदेखील वाढणार नाही आणि मेट्रोची कनेक्टव्हिटीही वाढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button