आईस बेडवर पहुडले अस्वल; छायाचित्र जगात सर्वोतम | पुढारी

आईस बेडवर पहुडले अस्वल; छायाचित्र जगात सर्वोतम

लंडन ः समुद्रात तरंगणार्‍या हिमनगावर निद्राधीन झालेल्या ध्रुवीय अस्वलाच्या थक्क करणार्‍या छायाचित्राने जगातील सर्वोत्तम छायाचित्राचा मान मिळवला आहे. इंग्लंडमधील निमा सारीखानी यांनी हे अप्रतिम छायाचित्र टिपले आणि ते जगात सर्वोत्तम ठरले आहे.

लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने आयोजित केलेल्या निसर्ग छायाचित्र स्पर्धेत जगभरातून आलेल्या 49 हजार छायाचित्रांमधून सारीखानी यांच्या या छायाचित्राची निवड केली गेली. जगातील सर्वात धोकादायक व आक्रमक मानल्या जाणार्‍या ध्रुवीय अस्वलाची ही छबी निसर्ग अभ्यासकांना अवाक् करून गेली. बीबीसीशी बोलताना नॅचरल हिस्टरी म्युझियमचे संचालक डॉ. डग्लस ग्यूर म्हणाले, असे छायाचित्र व छायाचित्रातील प्रसंग खरंच दुर्मीळ. अत्यंत सुंदर आणि तरंगणार्‍या हिमनगामुळे आपल्या पृथ्वीला असलेल्या धोक्याचेही दर्शन घडते. प्राणी आणि त्यांचा अधिवास यांच्यातील अतूट नात्याबाबत आणि वातावरण बदलामुळे अधिवास नष्ट होण्याची गंभीर समस्या यावर भाष्य करणारे हे छायाचित्र विचार करायला भाग पाडते. या स्पर्धेत त्झाही फिंकलस्टेन यांचे ‘द हॅपी टर्टल’, डॅनियल डेनसेस्कू यांचे ‘स्टारलिंग मर्मरेशन’, मार्क बॉयड यांचे ‘शेअर्ड पॅरेंटिंग’ आणि ऑरन रिकार्डसन् यांचे ‘ऑरोरा जेलीस’ ही छायाचित्रे विजेत्यांच्या यादीत आहेत.

कसे टिपले छायाचित्र?

हिमनगावर निवांत झोपलेल्या ध्रुवीय अस्वलाचे छायाचित्र सरीखानी यांना महत्प्रयासाने मिळाले. नॉर्वेच्या स्वालबार्ड द्वीपकल्पात एका मोहिमेवर असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात तरंगणारे हिमनग दिसले. त्यातल्या एका हिमनगाला वळसा घालून जात असतानाच बर्फाच्याच कुशीत झोपलेले हे ध्रुवीय अस्वल दिसले. त्यांनी हा दुर्मीळ व मनमोहक क्षण कॅमेर्‍यात टिपला. ‘आईस बेड’ या नावाने त्यांनी हे छायाचित्र स्पर्धेसाठी सादर केले.

कोण आहेत निमा सरीखानी ?

निमा सरीखानी हे इंग्लंडमधील हँबल्डन कॅपिटल कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार आहेत. हौशी निसर्ग छायाचित्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. केवळ आपल्या छंदासाठी त्यांनी जगभरात भ्रमंती करून
हजारो छायाचित्रे टिपली आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांची छायाचित्रे हजारो लाईक्स घेतात.

स्पर्धेचे वैशिष्ट्य…

लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने केले आयोजन.
95 देशांतील छायाचित्रकारांनी पाठवली 49 हजार छायाचित्रे.
अंतिम यादीत निवडली गेली फक्त 25 छायाचित्रे.
जगभरातील 75 हजार लोकांनी मतदान करून केली निवड.

Back to top button