Pune Division : पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची वर्णी | पुढारी

Pune Division : पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची वर्णी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या जागेवरील अधिकारी सौरभ राव यांची बदली सहकार आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर डॉ. पुलकुंडवार यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या साखर आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (दि.5) सायंकाळी जारी केले आहेत. तीनही अधिकार्‍यांच्या पुण्यातच बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार हे पुण्यातच साखर आयुक्त या पदावर कार्यरत होते. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना शासनाने सचिव संवर्गात नुकतीच पदोन्नती दिली आहे. ते 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. नाशिक महापालिका आयुक्त, रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम बघत होते. समृद्धी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रियेचे काम त्यांनी पाहिले आहे. तत्पूर्वी त्यांनी यवतमाळमध्ये उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी, मेळघाटमध्ये उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक आदी पदांवर काम केले आहे.

2008 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुणे विभागीय आयुक्त पदावर सौरभ राव हे गेली तीन वर्षे कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीत कोरोना महामारी तसेच पुणे विभागातील महसूल विषयक सुधारणा कार्यक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले. सहकार आयुक्तपदी कार्यरत असलेले अनिल कवडे यांना पुण्यातच साखर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची पुण्यातील बॅकवर्ड बहुजन कल्याण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button