कोल्हापूर : 73 प्राध्यापक भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीस मान्यता | पुढारी

कोल्हापूर : 73 प्राध्यापक भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीस मान्यता

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठातील सुमारे 73 हून अधिक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने प्राध्यापक भरतीची जाहिरात काढण्यास व्यवस्थापन परिषद बैठकीत मान्यता देण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक  सोमवारी (दि.5) कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. क्रीडा स्पर्धेसाठी 80 ऐवजी 150 दैनिक भत्ता देण्याचे ठरले. विधीच्या अपात्र विद्यार्थ्यांना बार कौन्सिलच्या निर्णयास अधीन राहून सम-विषममध्ये परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. महाविद्यालय दर्जा तपासणीसाठी व्यवस्थापन परिषदेमधून नावे निर्देशित करण्यात आली.

अधिसभेत येणारे प्रश्न व बजेट, ऑडिट रिपोर्टसाठी नावे निर्देशित केली गेली. तसेच बांधकाम समितीच्या शिफारशी, चेंजिंग इन स्टाफ फॉर्मला मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषदेत 60 वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आले. बी.कॉम. बँकिंग आणि फायनान्स शाखा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली. अध्यासन निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार्‍या कमिटीचा अहवाल मंजूर करण्यात आला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, स्वागत परुळेकर, डॉ. आर. डी. ढमकले, सिद्धार्थ शिंदे, डॉ. आर. व्ही. गुरव आदी उपस्थित होते.

विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या देखभाल व स्वच्छतेसाठी कमिटी नियुक्त करावी, असे परुळेकर यांनी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने व्यवस्थापन परिषद सदस्यांचा कमिटीत समावेश करावा. त्यांनी लिखित स्वरूपात नियमावली तयार करावी, याबाबत व्यवस्थापन परिषद बैठकीत चर्चा झाली.

Back to top button