पाणी टंचाईच्या झळा : फेब्रुवारीतच टँकरची संख्या दीडशे पार | पुढारी

पाणी टंचाईच्या झळा : फेब्रुवारीतच टँकरची संख्या दीडशे पार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र होत असून, हिवाळा संपत असतानाचा टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुणे विभागात 154 टँकरद्वारे सुमारे तीस लाख नागरिकांना आणि एक लाख जनावरांना पाणी पुरवले जात आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात 17 टँकर सुरू असून, एका आठवड्यात सात टँकर वाढले आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात पुरंदर तालुक्यातील 15 गावे आणि 99 वाड्यांवरील 26 हजार 352 नागरिकांना 17 टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बारामतीमध्ये साडेचार हजार नागरिकांना पाणी पुरवले जात आहे. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत असून, 81 टँकरद्वारे 81 गावे आणि 292 वाड्यांवरील एक लाख 29 हजार नागरिक आणि 83 हजार जनावरांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यात 50 टँकरद्वारे एक लाख 20 हजार नागरिक आणि साडेपाच हजार जनावरांना पाणी पुरवले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार गावे आणि 35 वाड्यांवरील 13 हजार नागरिक आणि अकरा हजार जनावरांना चार टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

हेही वाचा

Back to top button