असेही प्रेम ! कुटुंबाने केले देशी गाईचे ओटीभरण | पुढारी

असेही प्रेम ! कुटुंबाने केले देशी गाईचे ओटीभरण

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : निरवांगी (ता.इंदापूर) येथील शेतकरी निवृत्ती रामचंद्र पेडकर यांनी आपल्या गोठ्यातील देशी गाई गौरीच्या ओटीभरणाचा कार्यक्रम करून देशी गाईच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आपल्या मुलांप्रमाणे गोठ्यातील गाई-बैलांवर प्रेम करत असतो. याचाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावामध्ये आला आहे. पेडकर कुटुंबीय गौरीला अत्यंत जिव्हाळा लावतात. सध्या गौरी सात महिन्यांची पोटोशी असून, दोन महिन्यांमध्ये तिला वासरू होणार आहे.अशातच पेडकर कुटुंबाच्या घरातील एका लहान मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. त्याचेच औचित्य साधत याच कार्यक्रमात त्यांनी गौरीच्या ओटीभरणाचा कार्यक्रम घेतला होता. ओटीभरणाच्या कार्यक्रमानिमित्त गौरीला सजविण्यात आले होते. गावातील महिलांनी गौरीचे औक्षण करून तिची ओटी भरली.

गाईचा वंश वाचविण्यासाठी युवकांचा पुढाकार
निरवांगी येथील युवकांनी एकत्र येऊन देशी गाईचा वंश वाचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, गावात गोरक्ष दलाची स्थापना केली आहे.हे युवक शेतकर्‍याच्या घरासमोर किमान एक तरी देशी गाई असावी यासाठी जनजागृती करीत आहेत. यासाठी अंकुश गणपत पवार,नवनाथ सपकळ, ज्ञानेश्वर पेडकर,गणेश रेडकर,सुरज पोळ, डॉ.राजेंद्र पोळ आदी प्रयत्न करीत आहेत.

 

Back to top button