मराठा समाज सर्वेक्षण: सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण | पुढारी

मराठा समाज सर्वेक्षण: सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, पहिले दोन दिवस तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, तिसर्‍या दिवशी गुरुवार (दि.25) पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल 4 लाख 23 हजार 854 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), शनिवार, रविवार अशा शासकीय सुट्या असल्या, तरी सर्वेक्षणा संदर्भातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची सहभागी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुट्यांच्या दिवशी सुरुवातीच्या दोन दिवसांतील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण सुरू झाले आहे.

त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार प्रगणकांमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र, सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने पहिले दोन दिवस अनेक अडथळे आले. त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी आल्याने संथ गतीने सर्वेक्षण सुरू होते. तसेच, जिल्ह्यातील दोन तालुके आणि 100 गावे सर्वेक्षणाच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये दिसतच नसल्याची बाब समोर आली. त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार अ‍ॅपमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून तब्बल 49 लाख नागरिकांची माहिती संकलित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनापुढे आहे. वरिष्ठ अधिकारी, राज्य मागासवर्ग आयोग, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, जिल्हा प्रशासन आदी सर्वेक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक घेत तसेच सर्वेक्षण वेळेत आणि विना अडथळे सुरू राहण्यासाठी काही तातडीने दुरुस्त्या करण्यात आल्या आणि निर्णय घेऊन सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी कुठलीही अडचण न येता सुरळीत सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

जिल्ह्यातील 49 लाख कुटुंबांचे होणार सर्वेक्षण
जिल्ह्यातील 49 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यातील 4 लाख 23 हजार 854 कुटुंबाचे सर्वेक्षण गुरुवारी पूर्ण झाले आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीतील 1 लाख 74 हजार 257, पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील 1 लाख 2 हजार 202 तर ग्रामीण (नगरपालिका- नगरपरिषद) भागात 1 लाख 47 हजार 395 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

कॅन्टोन्मेंटचे सर्वेक्षण आज सुरू होणार
शहरासह ग्रामीण भागाव्यतिरिक्त खडकी, देहू आणि पुणे कटक मंडळातील (कॅन्टोन्मेंट) अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण गुरुवारी
पूर्ण झाले असून, आज शुक्रवार (दि. 26 जानेवारी) पासून या परिसरांमधील सर्वेक्षणाला
सुरुवात होणार आहे.

Back to top button