प्रा. ककाली मुखोपाध्याय यांचा राजीनामा; सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया संस्थेत खळबळ | पुढारी

प्रा. ककाली मुखोपाध्याय यांचा राजीनामा; सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया संस्थेत खळबळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सुटी घेऊन कॅनडामध्ये गेल्यावरही संस्थेकडून आर्थिक लाभ उचलणार्‍या गोखले इन्स्टिट्यूच्या वरिष्ठ प्राध्यापक ककाली मुखोपाध्याय यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांचे प्रकरण अंगलट येताच कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचे धाबे
दणाणले अन् त्यांच्या दबावामुळे अखेर प्रा. मुखोपाध्याय यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले. त्यामुळे चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.

दैनिक ‘पुढारी’त गेल्या सात दिवसांपासून सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी व या संस्थेच्या अंतर्गत येणारे अभिमत विद्यापीठ गोखले इन्स्टिट्यूटमधील आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश प्रसिध्द केला जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाची पायमल्ली करीत मनमानी पद्धतीने संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख व कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा कारभार सुरू आहे. सुटी घेऊन कॅनडा येथे गेलेल्या वरिष्ठ प्राध्यापक ककाली मुखोपाध्याय यांनी तेथून परतल्यावर आर्थिक लाभ घेतले. याची तक्रार पुराव्यासह शिक्षण संचालकांकडे लेखी स्वरूपात झाली होती. ती संस्थेच्या दबावापोटी दाबून ठेवली होती. या प्रकरणाला दै.पुढारीने वाचा फोडली. हे प्रकरण प्रसिद्ध होताच प्रा. मुखोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे.

असा आहे घोटाळ्यांचा घटनाक्रम

सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव मिलिंद भगवान देशमुख यांनी 16 एकर जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांना निर्देश दिले आहेत. तेव्हापासून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी ह्या नामदार गोखले यांच्या संस्थेत सुरू असलेले आर्थिक घोटाळे एकापाठोपाठ बाहेर येऊ लागले. डॉ. अजित रानडे हेसुद्धा गोखले इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन मंडळात राहून स्वतःलाच कुलगुरू करून घेण्याच्या जय्यत तयारीत कसे होते, विद्यापीठ अनुदान आयोगाला फसवून मिलिंद देशमुख यांनी रानडे यांची शिफारस कशी केली. रानडे यांना कुलगुरू केल्यावर स्वतः च्या मुलाला आजीवन सदस्य करून घेण्यासाठी देशमुख यांनी लावलेली फिल्डिंग. तसेच प्रा. मुखोपाध्याय यांना दोन ठिकाणी वेतन मोबदला मिळावा अशी सोय रानडे आणि देशमुख यांनी कशी करून दिली करून दिली. याचे पुरावेच सादर करण्यात आले. त्याची रितसर तक्रार शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती.

प्रकरण अंगलट येताच वरदहस्त काढला

एकीकडे व्यवस्थापन मंडळालासुद्धा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याबद्दल उच्च शिक्षण संचालनालय, पुणे येथे तक्रार झाली होती. ती रोखण्यासाठी रानडे यांनी राजकीय वरदहस्त वापरल्याची जोरदार चर्चा होती. सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष दामोदर साहू यांना या बाबत काहीच वाटत नाही. त्याबद्दलही प्रचंड चर्चा आहे. त्यांच्या वाढत्या वयाचा अन् स्वभावचा फायदा घेत मिलिंद देशमुख आणि डॉ. रानडे यांनी संस्थेची तिजोरी कशी ताब्यात घेतली याची दबक्या आवाजात चर्चा होती. याला पुढारीने वाचा फोडली. मुखोपाध्याय यांचा अवैध कॅनडा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडताच त्यांची पाठराखण महागात पडत आहे. हे लक्षात येताच त्यांच्यावरचा वरदहस्त देशमुख व रानडे यांनी काढताच प्रा. मुखोपाध्याय यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

पोलिस अधिकारी कांबळे यांचे तपासचक्र सुरू

मिलिंद देशमुख यांच्यावर असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास पुणे पोलिसात कांबळे नावाच्या अधिकाऱ्याकडे बरेच दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, कारवाई होत नव्हती. दै.पुढारीत वृत्तमालिका सुरू होताच कांबळे यांनी तपासचक्र वेगाने सुरू केले असल्याचीही चर्चा आहे. या बाबत तपास अधिकारी कांबळे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा

Back to top button