लोकसभेच्या मदतीसाठी खा. सुळेंनी घेतली थोपटे पिता-पुत्रांची भेट | पुढारी

लोकसभेच्या मदतीसाठी खा. सुळेंनी घेतली थोपटे पिता-पुत्रांची भेट

अर्जुन खोपडे

भोर : खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे या पिता-पुत्रांची शुक्रवारी भोर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत मागचे सर्व विसरून आपल्याला मदत करावी, अशी गळ सुळे यांनी त्यांना घातल्याची चर्चा आहे. या भेटीबाबत भोर तालुक्यात उलटसुलट चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
खा. सुळे भोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा कार्यक्रम व शहरातील व्यापारी बैठकीसाठी भोरमध्ये आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी थोपटे पिता-पुत्रांची त्यांच्या संगमनेर – माळवाडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान मागील 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होती.

त्या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी एकमेकांचे काम केले नाही. पाच वर्षात एकत्र कार्यक्रम झाले नाहीत.खासदारांनी वेगळे कार्यक्रम केले. एकमेकांवर टिकाही झाल्या.अनेकदा एकाच कामाचे दोन वेळा भुमीपुजनही झाले.मात्र शुक्रवारी अचानक खासदार सुळे यांनी थोपटे पिता – पुत्रांची भेट घेतल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीत आमदार व खासदार एकमेकांचा प्रचार करणार का? आणि मागील काळात झालेल्या टीका विसरून पुन्हा एकमेकांचे गोडवे गाणार या संदर्भातही चर्चा लगेच सुरू झाल्या आहेत.

आमदार संग्राम थोपटे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदार संघात विजयाची ’हॅटि्ट्रक’ साधली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या यापूर्वीच्या विजयातही थोपटे यांचा सिंहाचा वाटा असतानाही विधानसभा अध्यक्षपदाची निवड असो, की मंत्रिपद या प्रत्येक वेळी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असतानाही त्यांच्या नावाला विरोध कोणी केला हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. सुळे यांना मागील निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात धावपळ करावी लागली होती. या वेळी राष्ट्रवादी पक्षातच गटा-तटाचे राजकारण झाले असून अजित पवार यांनीच राष्ट्रवादीवर दावा ठोकून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद पवार पर्यायाने खासदार सुप्रिया सुळे यांचे मतदारसंघातील राजकारण अडचणीचे झाले आहे.

काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय उरलेला नसुन लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार थोपटे यांची भेट घेतली असली तरी हे विळ्या-भोपळ्याचे वैर संपणार की, चिघळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बहीण भावाचे युद्ध रंगणार की संपणार, हा प्रश्न जरी चर्चेत असला तरी खासदार सुळे यांनी मात्र अजित पवारांचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आजच्या आमदार थोपटे यांच्या भेटीने निर्माण होत आहे.

Back to top button