..तरच नाट्यचळवळ महाराष्ट्रभर पोहचेल : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन | पुढारी

..तरच नाट्यचळवळ महाराष्ट्रभर पोहचेल : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पक्षांतर्गत वाद जरी असले, तरी सांस्कृतिक चळवळीला पक्षीय राजकारणाचे गालबोट लागता कामा नये, या शरद पवार यांच्या भूमिकेचे सर्वजण पालन करतात. हे नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनीही करायला हवे. अंतर्गत भांडणे थांबली पाहिजेत. शेवटी नाट्य परिषदेच्या अध्यक्षाला कॅबिनेट दर्जा नाही. लाल दिव्याची गाडी नाही किंवा भरीव आर्थिक तरतूदही नाही. तरीही राजकारणात होत नाहीत त्यापेक्षा अधिक गोष्टी नाट्य परिषदेमध्ये होतात. नाट्य परिषद ही नाट्य चळवळीची मातृसंस्था आहे. मातृसंस्था म्हणून सर्व शाखांना बरोबर घेऊन काम केले तरच नाट्यचळवळ महाराष्ट्रभर पोहचेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि. 5) केले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात पार पडला. त्यावेळी सामंत बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, शशी प्रभू, 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कलावंत स्वरूप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच, घंटानाद करून संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.

आम्ही कसे कसलेले कलाकार आहोत हे 15 महिन्यांपूर्वी सर्वांनीच पाहिले आहे. त्यावर कोणी नाटक लिहिले तर बरे होईल, अशी मार्मिक टिप्पणीही सामंत यांनी केली. सामंत म्हणाले, राजकीय व्यासपीठे अनेक निर्माण होतात. परंतु, सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, सांस्कृतिक चळवळीचा एक भाग म्हणून आपण नाटकाकडे, बालनाटकाकडे, लोककलांकडे बघतो. त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जो निधी नाट्य परिषदेला शासनाकडून किंवा प्रायोजकत्वातून मिळतो तो सगळा नाट्य संमेलनामध्ये खर्च करू नये. हा निधी टिकला पाहिजे.

ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी अभिनेते विक्रम गोखले यांनी दोन एकर जागा दिली आहे. वृद्धाश्रमाचे काम पुढे जायला हवे, असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. त्यावर नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीमध्ये होण्यापूर्वी या नियोजित वृद्धाश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केले जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली. दामले म्हणाले, मराठी रंगभूमी ही तीन गोष्टींवर उभी आहे. पायाभूत सुविधा जे शासन आपल्याला पुरवत आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि नाट्य रासिकांचा नाटकांना मिळणारा प्रतिसाद. कलाकारांनी जबाबदारीने आपल्या कलाकृती सादर केली पाहिजे. तसेच, नाट्यरसिकांनी पुढील पिढीला नाटक पाहण्यासाठी घेऊन येणे आवश्यक आहे. गज्वी यांनी मनोगत व्यक्त केले. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने दिवसभर गणेश कला क्रीडा मंचमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्ज भरावा लागतो, हे थांबले पाहिजे आणि साहित्य संमेलनाप्रमाणे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक देखील बिनविरोध झाली पाहिजे. या क्षेत्राला राजकारणाचा लवलेशही लागू नये.

– उदय सामंत, उद्योगमंत्री

हेही वाचा

Back to top button