धूम्रपानामुळे बदलतो मेंदूचा आकार; हृदयावरही हाेताे विपरीत परिणाम | पुढारी

धूम्रपानामुळे बदलतो मेंदूचा आकार; हृदयावरही हाेताे विपरीत परिणाम

नवी दिल्ली : ‘माणसाने धूम्रपान करावे अशी परमेश्वराची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असा सवाल दिवंगत कृषी शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी विचारला होता. माणसाने नको त्या सवयी लावून घेतल्या आणि स्वतःच आपले आरोग्य व पर्यायाने जीवन धोक्यात आणले. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो हे अनेकांना ठाऊक आहे; मात्र त्याचे दुष्परिणाम इतकेच नाहीत. धूम्रपानाचा हृदयावर आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होत असतो. एका नव्या संशोधनानुसार धूम्रपानामुळे मेंदू आकसतो!

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘बायोलॉजिकल सायकिएट्री : ग्लोबल ओपन सायन्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार धूम्रपानाचे अतिशय गंभीर दुष्परिणाम मेंदूवरही होतात. अमेरिकेच्या सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यानुसार जे लोक धूम्रपान करतात, त्यांचा मेंदू आकसत जातो. जर व्यक्तीने एका काळानंतर धूम्रपान करणे सोडून दिले, तर मेंदूचे पुढे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते;

मात्र आधीच आकसलेला मेंदू पुन्हा आपल्या मूळ आकारात येऊ शकत नाही. प्रा. लाउरा जे. बेरुत यांनी सांगितले की, धूम्रपानामुळे माणूस अकालीच वृद्ध होतो आणि अल्झायमरचा धोका एखाद्या नॉन स्मोकरच्या तुलनेत अनेक पटीने वाढतो. धूम्रपानामुळे मेंदूचा आकार व चेतापेशींवर दुष्परिणाम होऊ लागल्यावर मेंदूशी संबंधित कोणताही आजार होण्याचा धोका वाढतो.

न्यूझीलंडमध्ये धूम्रपानावर बंदी

2021 मध्ये न्यूझीलंडने देशात सिगारेटवर पूर्णपणे बंदी घातली. नव्या कायद्यानुसार न्यूझीलंडमध्ये जे नागरिक 2008 नंतर जन्मले आहेत, ते संपूर्ण आयुष्यभर सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत. 2008 मध्ये जन्मलेल्या मुलांचे 2021 मध्ये वय होते तेरा वर्षे. केवळ 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात तेरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची संख्या सहा लाख होती. पुढील वीस वर्षांमध्ये ज्यावेळी त्यांचे वय 33 वर्षे असेल, त्यावेळी यापेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के असेल. याचा अर्थ देशातील 60 टक्के लोक असे असतील ज्यांनी आयुष्यात कधी सिगारेटला हात लावलेला नाही! पुढील 40 वर्षांमध्ये ही संख्या वाढून सुमारे 90 टक्के होईल.

Back to top button