अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : किलबिलाटाने गजबजणार बालनगरी | पुढारी

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : किलबिलाटाने गजबजणार बालनगरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. जे आजवरच्या नाट्य संमेलनाच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. विशेष म्हणजे, संमेलनाच्या पूर्वसंध्येसह शुक्रवारी (दि. 5) नाट्य संमेलनाच्या दोन्ही दिवसही या बालनगरीत लहान मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
बालनाट्य नगरीमधील विविध कार्यक्रमांची निवड प्रकाश पारखी, धनंजय सरदेशपांडे, रूपाली (काठोळे) पाथरे, मयूरी जेजुरीकर, गौरी लोंढे या बालनाट्य चळवळीत भरीव योगदान देणार्‍या दिग्गजांच्या समितीने केली आहे.

ही बालनगरी भोईर नगर येथील मैदानावर असणार आहे. या विषयी माहिती देताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजपर्यंत 99 नाट्य संमेलन झाली. मात्र, यामध्ये लहान मुलांसाठी एखाद दुसरं नाटक किंवा बालगीतांचा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे नाट्य संमेलनात लहान मुलांचा सहभाग हा कमी प्रमाणात दिसायचा. संमेलन घेताना आम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी ‘बालनगरी’ हा एक वेगळा रंगमंच ठेवला आहे. लहान मुलांना बालपणापासूनच नाटकाची गोडी लागावी, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार व्हावेत, हा यामागील उद्देश आहे.

पूर्वसंध्येला स्थानिक बालकलाकारांच्या विविध कार्यक्रमाबरोबरच, सुटी गाजवलेले ‘बोक्या सातबंडे’ हे व्यावसायिक बालनाट्य, ग्रीप्स थिएटरचे गोष्ट सिंपल पिल्लाची, बालगीते, पपेट शो हे खास मुलांसाठी आकर्षण असणार आहे. तसेच क्लाऊन माईम अ‍ॅक्ट हा प्रकार पिंपरी – चिंचवडमध्ये पहिल्यांदाच सादर होणार आहे. नाट्य संमेलन काळात बालनगरीत विविध रंगारंग कार्यक्रम असणार आहेत. हे पाहण्यासाठी आम्ही महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, झोपडपट्टी भागात असणार्या शाळांमधील विद्यार्थी यांना आमंत्रित केले आहे; कारण तिकीट काढून असे कार्यक्रम त्यांना अनुभवता येणार नाहीत. तसेच इतरही लहान मुलं यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटतील, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button