

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्याचे दिवस कायम आरोग्याच्या दृष्टीने पोषक मानले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले प्रदूषण अन् विषाणूंच्या वाढत्या प्रमाणामुळे रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. कधी थंडी तर कधी तापमानात वाढ होत असल्याने वातावरणात कमालीचा बदल होत आहे. परिणामी सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हिवाळ्यात विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.
लहान मुले आजारी असल्याचे जास्त आढळून येत आहे. कोरोना काळात मुले घराबाहेर न पडल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याचे आणि त्यामुळे मुले वारंवार आजारी पडत आहेत, अशी शक्यता बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरडा खोकला, घशातील खवखव यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. एरव्ही औषधोपचार आणि घरगुती उपायांनी दोन- चार दिवसांत बरा होणारा खोकला आठ- दहा दिवस झाले तरी कायम राहत असल्याच्या तक्रारी रुग्ण डॉक्टरांकडे करत असल्याचे दिसून येत आहे. हवेतील गारठा, धूळ, मातीचे कण, प्रदूषण, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा त्रासांचा समावेश असतो. यंदा कोरड्या खोकल्याची समस्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
संतुलित आहाराचे सेवन आणि भरपूर पाणी प्यावे. पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप सतत येत असेल, खोकला असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजाराचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.
ऋतू बदलत असताना असे संक्रमण सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.
बदलत्या ऋतूमध्ये विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारांसाठी येत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात नागरिकांनी काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.
– डॉ. तुषार साळुंखे, जनरल मेडिसीन, पुणे
हेही वाचा