Pune News : दोन महिन्यांत महापालिकेत शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली | पुढारी

Pune News : दोन महिन्यांत महापालिकेत शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली

पुणे : महापालिकेच्या 60 पैकी 16 विभागांमध्ये सध्या ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत उर्वरित 44 विभागांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेच्या विविध विभागांतर्फे विकासकामांसाठीचे प्रस्ताव तयार केले जातात. हे प्रस्ताव टंकलिखित स्वरूपाचे असतात. ते फाइलमध्ये लावून प्रशासकीय मान्यतेसाठी विविध विभाग, अधिकार्‍यांकडे पाठवले जातात. यादरम्यान अनेकदा फाइल हरविणे, कागदपत्रे हरविण्यासारखे प्रकार घडतात. शिवाय फाइल नेमकी कुठे आहे, हे समजत नाही.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वापरली जाणारी ई-ऑफिस प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 60 पैकी 16 विभागांमध्ये सध्या ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत उर्वरित 44 विभागांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. ई-ऑफिसच्या माध्यमातून विकासकामे व प्रस्तावांची डिजिटल फाइल तयार होईल, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

कनिष्ठ अभियंता भरतीची सोमवारी जाहिरात

महापालिकेच्या वतीने लवकरच स्थापत्य शाखेतील 100 कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. यासाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीसाठी अनुभवाची अट नसेल, असे महापालिकेतर्फे आधीच स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या 135 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीदेखील जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता या यादीची मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील न्यायप्रविष्ट प्रकरणातील जागा वगळता अन्य जागांसाठी नव्याने भरती केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button