

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला आज ( दि. १९) अपघात झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने प्रेस टीव्हीच्या वृत्तानुसार, इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी पुष्टी केली आहे की, अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने पूर्व अझरबैजानमधील तेहरानपासून सुमारे 600 किमी दूर असलेल्या जोल्फामध्ये हार्ड लँडिंग केले आहे.
इब्राहिम रईसी इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात जात होते. स्टेट टीव्हीने इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अझरबैजान देशाच्या सीमेवर असलेल्या जोल्फा शहराजवळील ही घटना झाल्याचे म्हटलं आहे. इराणच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे; पण दाट धुक्यामुळे अडचणी येत आहेत. डोंगराळ भागात हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केले. हे ठिकाण ताब्रिझ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.
इब्राहिम रईसी रविवारी पहाटे रायसी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत अझरबैजानमध्ये धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. दोन्ही देशांनी आरस नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, हार्ड लँडिंगच्या घटनेनंतर बचाव कर्मचारी अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह टीमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या घटनेदरम्यान हेलिकॉप्टरचे काय झाले, या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे का, याबाबत कोणतीही माहिती लगेच उपलब्ध होऊ शकली नाही. वृत्तसंस्थांनी या घटनेबाबत वेगवेगळे स्पष्टीकरण दिले आहे.
६३ वर्षीय इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे कट्टरपंथी नेते आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे शिष्य आणि वारसदार म्हणूनही त्यांची ओळख आहे.
हेही वाचा :