Pune News : नववर्षात वाहतुकीचा ताण शिवाजी रस्त्यावर | पुढारी

Pune News : नववर्षात वाहतुकीचा ताण शिवाजी रस्त्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर आणि उपनगरातील नागरिकांनी सोमवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी केली. मध्य भागातील श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. त्याचा ताण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीवर आल्याचे दिसून आले. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद असल्याने मध्यभागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिवाजी रस्त्यालगतच्या गल्लीबोळात भाविकांनी बेशिस्तपणे वाहने लावल्याने कोंडीत भर पडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गर्दीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. देवदर्शन करून नववर्षाचे स्वागत करण्याच्या परंपरेनुसार सोमवारी पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी आपली दुचाकी वाहने जवळपासच्या रस्त्यांवर आणि गल्लीबोळात लावली होती. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक आणि मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

रस्त्यावर वाहनांचे पार्किंग

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी मध्यभागातील शिवाजी रस्ता, अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा रस्ता, गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. सोमवारी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांनी त्यांच्या कार रस्त्यावर बेशिस्तपणे लावल्या होत्या. दुचाकी गल्ली बोळात लावल्याने वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते.

मंदिरांच्या सभोवती सर्वाधिक कोंडी

ग्रामदैवत कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, सारसबाग श्री सिद्धिविनायक, श्री महालक्ष्मी मंदिर, बुधवार पेठेतील श्री दत्त मंदिर, श्री अक्कलकोट स्वामी मंदिर, श्री ओंकारेश्वर, श्री जंगली महाराज मंदिर, श्री शंकरमहाराज समाधी मंदिर येथे सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असताना देखील पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

हेही वाचा

Back to top button