युवाशक्तीचे आयपीएल

युवाशक्तीचे आयपीएल

संघ मजबूत हवा असेल तर खेळाडू तगडे असायला हवेत आणि ही बाब इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वच फ्रँचायझी कंपन्या चांगलेच जाणून असतात. अनेकदा अनकॅप्ड खेळाडू अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करत नाहीत आणि जे चमकतात, त्यांना पुढे जादा पैसे मिळतात. फ्लॉप खेळाडूंची तत्काळ हकालपट्टी केली जाते. परंतु तरुणांचा क्रिकेटकडे ओढा वाढण्यासाठी आयपीएलचे ग्लॅमर कारणीभूत ठरत आहे. मालामाल करण्याबरोबरच राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठीही खेळाडूंना 'आयपीएल' ही पायवाट ठरत आहे.

दीड दशकांपेक्षा अधिक काळापासून आयपीएलचा भारतात बोलबाला असून त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली आहे. याशिवाय देश-विदेशातील अनेक तरुणांना भारीभक्कम पैसे देऊन त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधीही मिळत आहे. म्हणूनच आयपीएलला कोट्यधीश करणारी कंपनी, असेही म्हटले जाते. यंदाचे वर्ष 'मिनी लिलावा'चे होते. परंतु यातही समीर रिझवी, शुभम दवे, कुमार कुशाग्र, रॉबिन मिंज आणि एम. सिद्धार्थसारख्या पहिल्या पायरीवर असलेले खेळाडू कोट्यधीश झाले. काहींना तर एवढे पैसे मिळाले की, तेवढे पैसे तीन दशकांपूर्वीच्या क्रिकेटपटूंना संपूर्ण आयुष्यातही कमवता आले नाहीत.

यंदा अनकॅप्ड खेळाडूंत सर्वात मोठी लॉटरी लागली ती मेरठच्या समीर रिझवीची. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे ज्यांना अद्याप आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, असे खेळाडू. यावेळी असे काही अ‍ॅनकॅप्ड खेळाडू चर्चेत होते, ज्यांना आतापर्यंत आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. समीरला चेन्नई सुपरकिंग्जने 8.4 कोटी रुपयांत खरेदी केले. विशेष म्हणजे या 20 वर्षीय क्रिकेटपटूने अलीकडेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्याने फारसे क्रिकेटही खेळलेले नाही. त्याने यावर्षी यूपी टी-20 लीगमध्ये धमाल उडवून दिली. त्यामुळे त्याने अनेक आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले.

या लीगमध्ये त्याने नऊ सामन्यांत दोन शतकांसह 455 धावा केल्या. याप्रमाणे नागपूरमध्ये पानटपरी चालविणारे बद्रीप्रसाद यांचा मुलगा शुभम शर्मा याला राजस्थान रॉयल्सने 5.6 कोटी रुपयांत खरेदी केले. एवढे पैसे मिळतील, अशी अपेक्षाही त्याने बाळगली नव्हती. कुमार कुशाग्रला दिल्ली कॅपिटल्सने 7.2 कोटी रुपयांत, रॉबिन मिंजला गुजरात टायटन्सने 3.6 कोटी रुपयांत आणि एम. सिद्धार्थला लखनौ सुपरजायंटस्ने 2.4 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलने त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच चार चाँद लावले आहेत. या पंखाच्या आधारे आता किती झेप घ्यायची हे त्यांच्या हातात आहे. याप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मुळात आयपीएलचा फॉर्मेटच अनकॅप्ड खेळाडूंची मागणी नोंदविणारा आहे. प्रत्येक संघाला निश्चित संख्येत अनकॅप्ड खेळाडूंना घ्यावे लागते आणि यासाठी ते वर्षभर तरुणांच्या शोधात असतात आणि त्यांना घेण्यासाठी ते सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतात. सर्व फ्रँचायझींना एक गोष्ट ठाऊक असते आणि ती म्हणजे अनकॅप्ड खेळाडू कितीही सक्षम असला तरी त्याचा संघ हा बळकट होऊ शकत नाही. कारण अनकेदा तरुण ऐनवेळी अपयशी ठरताना दिसतात. परंतु जे यशस्वी होतात, त्यांना भविष्यात चांगली रक्कम मिळू लागते. फ्लॉप खेळाडूंना तत्काळ संघाबाहेरचा रस्ता दाखविला जातो. आयपीएल लिलाव म्हणजे चमत्काराला नमस्कार असे म्हणता येईल.

यासंदर्भात आपण जयदेव उनाडकटचे उदाहरण घेऊ. त्याला 2018 मध्ये 11.5 कोटी रुपयांत खरेदी केले. मात्र तो आगामी वर्षात छाप पाडू शकला नाही. उमेश यादवचे मूल्यही दोन कोटींपर्यंत घसरले आहे. गेल्यावर्षी चांगली कामगिरी करत त्याला 5.8 कोटी रुपये मिळाले होते. बहुसंख्य तरुण खेळाडू स्टार होतात आणि दुसर्‍याच वर्षी ते लुप्त होतात. वेगवान गोलंदाज कामरान खानला तर दिवंगत गोलंदाज शेन वॉर्न हा 'टॉरनॅडो' म्हणायचा. पण पहिल्याच हंगामात हा हिरो शैलीवरून वादात अडकला आणि तेथेच ढेपाळला. अशा खेळाडूंत नाथू सिंह आणि पवन नेगीसह अनेक खेळाडूंचा समावेश करता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news