बिबट्याची वाढती संख्या ठरतेय शेतकर्‍यांची डोकेदुखी | पुढारी

बिबट्याची वाढती संख्या ठरतेय शेतकर्‍यांची डोकेदुखी

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : बिबट्यांची वाढती संख्या ही जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांतील नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागली आहे. या तालुक्यात असलेली उसाची शेती व मुबलक पाणी यामुळे बिबट्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पूर्वी एक – दोन बिबटे आढळून येत होते. आता बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, दिवसाढवळ्या लोकवस्तीतही बिबट्या दिसू लागला आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करीत असल्याने बिबट आणि मानवाचा संघर्ष सुरू झाला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये शाश्वत पाणीसाठा आहे. परिसरातील पिंपळगाव जोगा, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे धरणामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणावर उसासह बागायती शेती केली जाते. जंगल विरळ झाल्याने बिबट्याने उसाच्या शेतीलाच प्राधान्य दिले आहे. उसाच्या शेतीतच बिबट्याचे प्रजनन होत आहे. हजारो एकरावर या भागात असलेल्या ऊस शेतीमुळे बिबट्याला सुरक्षित निवारा लाभला आहे. त्यातून बिबट्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या :

मानवी वस्तीजवळ वास्तव्य केल्याने बिबटे अन्नाच्या शोधात गाव व वाडीवर येत आहेत. पशुधनाला बिबट्याने लक्ष्य केल्याने शेतकर्‍यांचे तसेच मेंढपाळांचे मोठे नुकसान होत आहे. पाळीव प्राण्यांसोबतच मानवावरदेखील बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. याच आठवड्यात अनेक ठिकाणी बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. बिबट्याच्या समस्येवर शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बिबट सफारीचा प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी होत आहे. तसेच माणिकडोहप्रमाणे आणखी एक बिबट निवारा केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.

Back to top button