माझ्या मनात काय चाललय हे शिरसाटांना कसे कळणार? : जयंत पाटील | पुढारी

माझ्या मनात काय चाललय हे शिरसाटांना कसे कळणार? : जयंत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : माझ्या मनात काय चाललय हे शिरसाटांना कसे कळणार? त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार असे वक्तव्य करण्याचा त्यांचा काय उद्देश आहे हे त्यांनाच माहित. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मला गरीबाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारा, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलण्याचे टाळले.

इस्लामपूर येथे अयोध्येहून आलेल्या कलशपूजन कार्यक्रमावेळी आमदार जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. राम हे सर्वांचे आहेत. कोणत्या एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे आयोध्येत राम मंदिर उभा राहत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. निमंत्रणावरून वाद झाला. पण कुणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे. पण सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे. कुण्या एका पक्षाने देणगी दिली नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे. रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापणा झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता. पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात असल्याचा आरोप होत आहे. गर्दी असताना मी मंदिरात जात नाही, गर्दी कमी झाल्यावर मी अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

लोक आपल्याबद्दल सतत बोलत असतात, प्रत्येकाला उत्तर देत बसले तर काम कधी करणार. मी मनाने कुठे आहे हे शिरसाट कसे सांगत आहेत, माझ आणि शिरसाट यांचे कधी बोलणे पण झाले नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Back to top button