शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात विद्यार्थी काढणार ’लेखणी ज्योत’ | पुढारी

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात विद्यार्थी काढणार ’लेखणी ज्योत’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळा दत्तक योजना रद्द करून सरकारने शिक्षणावर खर्च करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शून्य शुल्क योजना आणि राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेची अंमलबजावणी करावी, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे या मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (एसएफआय) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता भिडे वाडा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशी पायी लेखणी ज्योत रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती एसएफआयचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, नवनाथ मोरे, अक्षय निर्मळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा न्यायालयीन मार्ग मोकळा झाला, ही स्वागताची बाब आहे. मात्र, राज्य सरकारने सरकारी शाळा दत्तक योजनेचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सरकारी शाळांना निधी देणे, त्यांचा दर्जा उंचावणे ही सरकारची जबाबदारी आहे; परंतु सरकार या जबाबदारीतून पळ काढत आहे. सरकारी शाळांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालत आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणातील शिष्यवृत्त्या कमी केल्या जात आहेत.

शाळा दत्तकचा निर्णय म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल आहे. शिक्षणाचे हे बाजारीकरण गोर-गरीब व सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे एसएफआयचे विद्यार्थी 3 जानेवारी रोजी ही लेखणी ज्योत काढणार आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण, सरकारी शाळा वाचवण्यासाठी या लेखणीज्योत पायी रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन एसएफआयतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button