थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल : देवेंद्र फडणवीस | पुढारी

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल : देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात 65 हजार 502 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आली आहे. चालू आर्थिक वर्षात देशात कोणत्याही राज्यापेक्षा आलेली ही सर्वाधिक गुंतवणूक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 या सुमारे दीड वर्षात एक लाख 83 हजार 924 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीबाबत डीपीआयआयटीने दिलेल्या आकडेवारी सादर करत ‘एक्स’वरून यासंदर्भातील माहिती दिली. डीपीआयआयटीच्या आकडेवारीनुसार सन 2022- 23 या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार 422 कोटींची थेट परकीय गुंतवणूक मिळवून महाराष्ट्र अव्वल आला होता. 2023- 24 च्या एप्रिल ते जून 2023 या पहिल्या तिमाहीत 36 हजार 634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक झाली. जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 28 हजार 868 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राला यश आले.

Back to top button