झेंडूने केली शंभरी पार ; उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान | पुढारी

झेंडूने केली शंभरी पार ; उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  झेंडूच्या फुलांचे बाजारभाव वाढले असून प्रतिकिलोला 100 रुपये मिळू लागले आहेत. तर दुसरीकडे दाट धुके व ढगाळ वातावरणामुळे झेंडूला फटका बसू लागला आहे. एकीकडे वाढत्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर काहीसे समाधान आहे, तर रोगांच्या प्रादुर्भावामुळे चिंताही पाहायला मिळत आहे. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झेंडुचे मळे शेतकर्‍यांनी फुलवले आहेत. यंदा गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत फुलांचे बाजारभाव कोसळले होते. मात्र आता बाजारात झेंडुच्या फुलांना चांगलीच मागणी वाढली असून, दरानेही शंभरी पार केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज पडणारे दाट धुके आणि अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे झेंडूवर करपा आणि बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

त्यामुळे झेंडूची झाडे सुकून उत्पादन घटले आहे. एकवेळ औषध फवारणीनंतर करप्याचा प्रादुर्भाव कमी होतो; परंतु बुरशीने ते झाड नियंत्रणात येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. खूप दिवसानंतर झेंडूच्या फुलांना बाजारभाव वाढल्याचे जळगाव येथील उत्पादक शेतकरी बबन नेहरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, दरवर्षी आम्ही झेंडू फुलांची लागवड करीत असतो. यंदा गणपती, दसरा, दिवाळीत फुलांना म्हणावा तसा बाजारभाव मिळाला नाही. तथापि, आता बाजारभाव वाढल्यामुळे फुलशेतीमधून चार पैसे अधिक मिळू शकतात.

हेही वाचा :

Back to top button