बीड : आई-बापाने लाथाडले, नातेवाईकांनी नाकारले, तीन चिमुकले ‘सैरभैर’ | पुढारी

बीड : आई-बापाने लाथाडले, नातेवाईकांनी नाकारले, तीन चिमुकले 'सैरभैर'

माजलगाव प्रतिनिधी : मुलांची जबाबदारी आई-वडिलांवरच असते; पण त्‍यांनीच त्‍यांना नाकारले आहे; मग आम्ही का मुले सांभाळायची, या भावनेने नातेवाईकांनी तीन चिमुकल्यांना गावाच्या पुलावर सोडले. एक क्षणात ही मुले उघड्यावर पडली.  सैरभैर झालेल्‍या मुलांना ग्रामस्‍थांनी आधार दिला. पाेलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. अखेर या मुलांची रवानगी बाल आश्रमगृहात झाली. हा ह्‍दयद्रावक प्रसंग  माजलगाव तालुक्यातील (जि.बीड ) पुंगनी गावात घडला. आई-बापाच्‍या ‘कर्मा’ची शिक्षा तिघा चिमुकल्‍यांना का, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

  • तीन चिमुकल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी माजलगाव तालुक्यातील (जि.बीड ) पुंगनी गावच्या पुलावर आज पहाटे (दि.१८) बेवारस सोडून दिले.
  • ही घटना आज सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आली.
  • पोलिसांनी तिन्‍ही मुलांची  बाल आश्रमगृहात व्यवस्था केली आहे.

आई-वडिलांच्या आंतरजातीय विवाह

याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव यांचा माजलगाव तालुक्यातील पुंगनी येथील तरुणीसोबत आंतरजातीय विवाह सुमारे दहा वर्षांपूर्वी  झाला होता. आर्यन (वय 6 वर्षे), अनिकेत (4 वर्षे) व आराध्या (2 वर्ष) अशी तीन मुले आहेत. दरम्यान, दाम्पत्यामध्ये वाद झाल्याने दोघेही विभक्त राहू लागले. विभक्त राहत असताना मुले नातेवाईकांकडे राहू लागली.

नातेवाईकांनीही मुलांना नाकारले? 

 मुलांचे वडील ज्ञानेश्वर मोठ्या शहरात वास्तवास गेले, तर आईने मुलांना नातेवाईकांच्या हवाली सोडून गेली. दरम्यान, काही दिवस नातेवाईकांनी मुलांना सांभाळले. “परंतु आई-वडीलच मुलांची जबाबदारी नाकारत आहेत. आम्ही ही मुलं का सांभाळायची?” अशा भावनेने आज (दि.१९) पहाटे नातेवाईकांनी या तीन चिमुकल्यांना त्यांच्या आईचे गाव पुंगनी येथील पुलावर सोडून दिले. ही बाब ग्रामस्‍थांच्‍या लक्षात येताच त्यांनी माजलगाव पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन बीडच्या बाल आश्रमगृहात त्यांना पोहोचण्याची व्यवस्था केली .

 मुलांच्या मामानेही हात झटकले

पोलिसांनी संबधित महिलेच्या माहेरी भावाला फोन केला. तिच्या भावाने सांगितले की, “बहिणीचा आंतरजातीय विवाह केल्यापासून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही.”  मुलांना बीडच्या बाल आश्रमगृहात पोहोचण्याची व्यवस्था पोलीस कर्मचारी यांनी मदत केली. डॉ. कैलास काटवटे, सरपंच आसाराम शिरसागर,  गोविंद शिंदे यांनी सदरील चिमुकल्यांना त्यांना कपडे आणि खाऊ घेतला. त्याचबरोबर पोलीसांनाही  सहकार्य केले.

हेही वाचा :

Back to top button