नैसर्गिक आपत्तीला धैर्याने सामोरे जावे | पुढारी

नैसर्गिक आपत्तीला धैर्याने सामोरे जावे

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  चालू हंगामात द्राक्षबागांना पोषक वातावरण होते. मात्र, मागील आठवड्यापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांनी धैर्याने या आपत्तीचा सामना केला पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक व द्राक्ष अभ्यासक राजेंद्र वाघमोडे यांनी केले आहे.  दै. ‘पुढारी’शी बोलताना राजेंद्र वाघमोडे म्हणाले की, जवळजवळ सर्व बागांची फळछाटणी पूर्ण झालेली आहे. द्राक्षबागा या पोंगा अवस्थेपासून ते माल काढणी अवस्थेपर्यंत आहेत. काही शेतकर्‍यांचा माल काढणीला आला आहे. शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होईलच, पण शेतकर्‍यांनी गाफील न राहता द्राक्षबागेमध्ये करावयाची कामे युद्धपातळीवर करून घ्यावीत, जेणेकरून आपल्या बागा सुस्थितीत येतील.

पोंगा अवस्था ते फुलोरा अवस्थांमधील बागांना केवडा (डाऊनी), भुरी (पावडरी), करपा इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी द्राक्ष संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, पोंगा अवस्था ते पाणी उतरणे अवस्थेपर्यंतच्या बागा बागायतदार अपार कष्ट घेऊन सुस्थितीमध्ये आणतात. फक्त फवारण्यांचा खर्च वाढतो. परंतु, त्यापुढील अवस्थांमध्ये मात्र पावसाने नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी बागायतदारांनी सर्वप्रथम चिरलेले मणी कामगारांकरवी काढून घडामध्ये एकही फुटका, चिरका मणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

काढलेले मणी बागेच्या बाहेर काढावेत. द्राक्षबागेवर हायड्रोजन पेरॉक्साईड (50%) 1.5 ते 2 मि.लि. प्रतिलिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी घ्यावी जेणेकरून चिरलेल्या मण्यांवर काळी करडी बुरशी वाढणार नाही. चिरलेल्या मण्यांवर विनेगार माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, त्यामुळे चांगले द्राक्षमणीही खराब होतात. या माशीच्या नियंत्रणासाठी संध्याकाळी जमिनीवर लँबडा सायहॅलोथ—ीनची फवारणी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत तयार झालेल्या द्राक्षघडांवर कोणतेही रासायनिक कीटकनाशक वापरू नये. त्यानंतर पुढे तयार मालाच्या बागेवर जैविक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा.

 

Back to top button