Pimpri News :पवना, मुळा व इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखा | पुढारी

Pimpri News :पवना, मुळा व इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखा

पिंपरी : शहरात दररोज सुमारे 300 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया होत असून, उर्वरित 59 दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभीयार्ने लक्ष घालून तात्काळ जलप्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाला दिले आहे.

कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी तथा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पदाधिकारी आदींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांची भेट घेतली. यात नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर, शिवसैनिक गणेश बाबर, योगेश राऊत, स्वप्नील शेटे, कौस्तुभ देशपांडे, परेश पटेल आदींचा समावेश होता. या वेळी अधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात 595 दशलक्ष लिटर इतके पाणी जलसंपदा विभागाकडून घेण्यात येते. त्यापैकी सरासरी 80 टक्के म्हणजेच 359 दशलक्ष लीटर सांडपाणी शहरातील आहे. सद्यःस्थितीत एकूण 363 दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे 16 मैला शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. मात्र, केवळ 300 दशलक्ष लीटर इतक्याच सांडपाण्यावर प्रक्रिया होत असून, उर्वरित 59 दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येत असून, जलप्रदूषणातही भर पडत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या जल प्रदूषणाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल. शिवाय, न्यायालयामध्ये जनहित याचिका व हरित लवादाकडेही तक्रार केली जाईल, असे शिष्टमंडळाने नमूद केले आहे. यावर एमपीसीबीकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मंचक जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

हेही वाचा

Pimpri News : रिव्हर सायक्लोथॉनच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील वाहतुकीत बदल

शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये, शिवसेना तुमच्या पाठिशी : उद्धव ठाकरे

Prajakta Mali : कोल्हापुरी साज अन् प्राजक्ताचं गुलाबी सौंदर्य!

Back to top button