परदेशी पक्ष्यांच्या वाटेत जल प्रदूषणाचा अडथळा !

परदेशी पक्ष्यांच्या वाटेत जल प्रदूषणाचा अडथळा !
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी हिवाळ्यामध्ये बर्फाळ आणि अतिथंड वातावरणातील पक्षी सुरक्षित आणि संतुलित वातारणाच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात येत असतात. मात्र, जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेल्या शहरातील नद्या, तलाव, पाणथळ जागांमधील पाणी प्रदूषित झाल्याने परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे, असे निरीक्षण शहरातील पक्षितज्ज्ञांनी मांडले आहे.
शहरातील पाणथळ जागांच्या ठिकाणी हे पक्षी पाहण्यास मिळतात.

शहरात टाटा मोटर्सचे सुमंत सरोवर, वाल्हेकरवाडी, रावेत, संभाजीनगर बर्ड व्हॅली, चिखली मैला शुद्धीकरण केंद्र आणि दगडांच्या खाणी आहेत. चिंचवडगावात नदीकाठी धनेश्वर मंदिर व गावडे घाट, चर्‍होली, रहाटणी, थेरगाव बोट क्लब, सीएमई इंजिनिअरींग कॉलेज आदी ठिकाणी पाणथळ जागी हिवाळ्यात विविध जातीच्या आणि परदेशी पक्ष्यांचा अधिवास आढळतो.

हे पक्षी ज्या ठिकाणाहून स्थलांतर करतात, त्या ठिकाणी बर्फामुळे अन्नाची कमतरता असते. त्याचप्रमाणे, पक्ष्यांसाठी हवामान प्रतिकूल असते. त्यामुळे पक्षी स्थलांतर करतात. तसेच विणीच्या काळात घरटे बांधण्यास सुरक्षित जागा व परिस्थिती नसल्याने या पक्ष्यांचे स्थलांतर होते. शहरामध्ये युरोप, रशिया, सैबेरिया येथून परदेशी तर हिमालय, मेघालय, उत्तर प्रदेश येथूनही काही पक्ष्यांचे आगमन होते. चक्रवाक, शेकाट्या, तांबूल, मोन्टाग्युचा भोवत्या, लाल अंजन, नकटा, थपाट्या आदी पक्ष्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

स्थलांतराचे प्रमाण घटले

शहरातील पाण्याचे स्रोत नाहीसे होत चालले आहेत. पक्ष्यांना आसरा घेण्यासाठी पुरेशी झाडे नाहीत. नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. पाणी अशुद्ध होऊन वेगवेगळी रसायने त्यामध्ये मिसळत आहे. पर्यायाने, मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती व पाणथळ जागा नष्ट होत आहेत. आपल्याकडील माळरानावरच्या पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शहरीकरणामुळे त्यांचे स्थलांतर दुसरीकडे होते. पाणवठे बुजविण्यात आले आहेत. पर्यायाने, परदेशातून आणि परराज्यातून स्थलांतर करून येणार्‍या पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आपल्याकडे सुमंत सरोवर याठिकाणी गार्बियन, चक्रवाक, नकटा, थापट्या आदी पक्षी येतात. हे पक्षी मोशी येथे यायचे ते बंद झाले आहेत.

युरोप, मंगोलिया आणि रशिया येथील बर्फाळ प्रदेशात थंडीच्या दिवसात बर्फवृष्टी झाल्याने पक्ष्यांची खाण्याची आबाळ होते. त्यामुळे हे पक्षी पिंपरी-चिंचवड शहरात काही महिने राहून पुन्हा स्थलांतर करतात. आपल्याकडे येणारे पक्षी पाणथळ जागी वास्तव्य करणारे असतात. तसेच ते पाणथळ जागी असणार्‍या वनामधील किटक खातात. मात्र, आपल्याकडील पाणी प्रदूषित झाल्यामुळे त्यांना पाण्यातील जीव खाण्यास मिळत नाहीत. पर्यायाने, त्यांची संख्या देखील कमी झाली आहे.

-विश्वनाथ भागवत, पक्षिनिरीक्षक तथा अध्यक्ष, अलाईव्ह संस्था

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news