Dhangar Reservation : खंडेरायाची पूजा करून धनगर आरक्षणाचा संकल्प | पुढारी

Dhangar Reservation : खंडेरायाची पूजा करून धनगर आरक्षणाचा संकल्प

जेजुरी : पुढारी वृतसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्यदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाला पूजा अभिषेक घालून धनगर आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी संकल्प सोडण्यात आला. यासाठी ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात बैठक घेण्यात आली. या वेळी धनगर समाजाचे नेते डॉ. शशिकांत तरंगे, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रवीण काकडे, मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त अभिजित देवकाते, किशोर मासाळ, रमेश लेंडे, सचिन खोमणे, प्रशांत खोमणे, संतोष खोमणे आदी मान्यवर व धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर या सर्वांनी कुलदैवत खंडोबादेवाचा आशीर्वाद घेऊनच सर्व लढाया जिंकल्या आहेत. आता ही आरक्षणाची लढाईदेखील खंडोबादेवाला अभिषेक घालून व संकल्प सोडून जिंकावी लागणार असल्याचे डॉ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले. या वेळी जेजुरीगडावर तळी भंडार करून भंडार्‍याची उधळण करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव आपली पारंपरिक घोंगडी व कुर्‍हाड घेऊन सहभागी झाले होते.

तत्पूर्वी सर्व समाजबांधवांनी छत्री मंदिरात असलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय’, अशा घोषणा देत सर्व समाजबांधव पायरीमार्गावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून व फुलांचा वर्षाव करीत गडावर अभिषेक व संकल्प सोडण्यासाठी जमा झाले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देणार असल्याचे डॉ. शशिकांत तरंगे, प्रविण काकडे व अभिजित देवकाते आदींनी सांगितले.

हेही वाचा

नारायणगाव उपसरपंचपदी बाबू पाटेंची बिनविरोध निवड

वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट

कवडीपाट-कासुर्डी भागाकडे ‘एनएचएआय’चे दुर्लक्ष

Back to top button