Pimpri News : फटाक्यांचा आवाज पोहचला 99 डेसिबलपर्यंत | पुढारी

Pimpri News : फटाक्यांचा आवाज पोहचला 99 डेसिबलपर्यंत

वर्षा कांबळे

पिंपरी : दिवाळी सणानिमित्त शहर व उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात आवाजाचे व रोषणाईचे फटाके फोडले गेले. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरातील तीन भागात तपासणी करण्यात आली. निवासी व व्यावसायिक क्षेत्रात 40 ते 65 डेसिबलची ध्वनी मर्यादा असताना यंदा फटाक्यांचा आवाज 99 डेसिबल इतका जास्त नोंदविला गेला आहे.

शहरामध्ये चिंचवड येथील चापेकर चौक, पिंपरीतील डिलक्स चौक, थेरगाव येथील मुख्य चौकात महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने ध्वनिमापक यंत्रणा बसविली आहे. रहिवासी क्षेत्रापासून दूर वर्दळीच्या ठिकाणी यंत्रणा बसविल्याने तेथे फटाके कोण फोडणार, हा प्रश्नच आहे. त्याचप्रमाणे, हॉर्न आणि फटाक्यांचा आवाज यांचे अचूक मॉनिटरींग कसे होते याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

यंदा सणावरील निर्बंध हटविल्याने नागरिकांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. दरवर्षी मोठ्या आवाजाचे फटाके न फोडता रोषणाई करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन केले जाते. काही मोठ्या आवाजाच्या म्हणजे सुतळी बाँम्बसारख्या फटाक्यांवर बंदी असतानाही हे फटाके मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी करून फोडले आहेत. या फटाक्यांचा आवाज सर्वात जास्त आहे. तसेच इतरही फटाक्यांच्या माळा, एकामागोमाग एक फुटणारे मोठ्या आवाजाचे फटाके असे फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात सणाव्यतिरिक्तही मिळतात.

फटाक्यांच्या आवाजाचे दुष्परिणाम

ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, असाध्य आजार असणारे रुग्ण आणि बालकांसाठी फटाक्यांचा आवाज धोकादायक आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे प्राणी व पक्षी यांच्यावरदेखील परिणाम होतो. त्याचप्रमाणे, कान दुखणे, तात्पुरता बहिरेपणा आदी बाबी यामुळे येऊ शकतात.

आवाज मोजण्याची यंत्रणा मोजक्याच ठिकाणी

शहरातील चिंचवड, पिंपरी आणि थेरगाव येथे फक्त आवाज मोजण्यासाठी यंत्रणा आहे. या भागात किती आवाज होता, याची तपासणी केली जाते. मात्र, निगडी, भोसरी, दापोडी, मोशी, चिखली येथे अद्याप आवाज मोजण्याची यंत्रणाच नाही. या भागात आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असू शकते. तथापि, ते मोजले जात नाही.

शहरातील ज्या तीन भागात ध्वनीमापक यंत्रणा बसविली आहे, तेथे कर्मचारी नेमले होते. त्याचा अहवाल आला आहे. शहरातील इतर ठिकाणी ध्वनी मोजण्याची यंत्रणा नाही. त्या ठिकाणी ध्वनी मोजण्याची यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

– मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ

हेही वाचा

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बिवी यांचे निधन

अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

नारायणगाव उपसरपंचपदी बाबू पाटेंची बिनविरोध निवड

Back to top button