Pune News : मराठा क्रांती मोर्चाकडून छगन भुजबळ यांचा निषेध | पुढारी

Pune News : मराठा क्रांती मोर्चाकडून छगन भुजबळ यांचा निषेध

पुणे : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहोत. भुजबळ हे ओबीसीचे नेतृत्व करीत असल्याचे बोलत असले, तरी एका घटकापुरते करीत असून, बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांच्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, तुषार काकडे, अमर पवार, बाळासाहेब अमराळे, गणेश मापारी, रेखा कोंडे, जितेंद्र कोंढरे यांसह मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, नाव महात्मा फुलेंचे घ्यायचे, मुखवटा समतेचा घ्यायचा, नेतृत्व ओबीसीचे करतो, असे दाखवायचे आणि स्वकल्याणाचाच मार्ग चोखाळायचा, ही भुजबळ यांची नीती राहिलेली आहे.

भुजबळसाहेब प्रतिनिधित्व करीत असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमध्ये समतेचे महात्मा फुले यांचे मूळ तत्त्वज्ञान होते त्या तत्त्वज्ञानालाच छेद देऊन समता ही त्यांनी एक जातीय लिमिटेड समता केलेली आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. महामंडळाच्या 2015-16 पासून 2022-23 पर्यंत बीजभांडवल योजनेंतर्गत फक्त 894 लाभार्थ्यांना 4 कोटी 38 लाख रुपये कर्ज रक्कम वितरित केली आहे.

तर महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत एकूण 2877 लाभार्थ्यांना 11.38 कोटी रुपये कर्ज रक्कम वितरित केलेली आहे. 2020-21 पासून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 232 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 81 लाख फक्त, तर राष्ट्रीय महामंडळाच्या योजनेंतर्गत जानेवारी 2021 पर्यंत 2235 लाभार्थींना 148 कोटी रुपयांचे कर्ज वितरण झालेले आहे. दुसर्‍या बाजूला ओबीसी प्रवर्गातील एका जातसमूहाने सुमारे पाच हजार कोटींचे बजेट घेतले आहे. याचा विचार भुजबळ यांनी करणे गरजेचे असल्याचे कोंढरे यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा

 

Back to top button