Pune News : अंगणवाडीताईंना नवा मोबाईल मिळेना | पुढारी

Pune News : अंगणवाडीताईंना नवा मोबाईल मिळेना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीचे काम ऑनलाईन करण्यासाठी मोबाईल दिले ते खराब झाले, पुन्हा नवीन मोबाईल देण्याची शासन फक्त घोषणाच करते, पण अजूनतरी मोबाईल दिलेले नाहीत. मग काय आम्हाला स्वतःच्याच मोबाईलमध्ये सगळी माहिती भरण्याचे बंधनकारक आहे. अगोदर सांगितले, ऑनलाईन नोंदीमुळे तुम्हाला हाताने नोंदवहीमध्ये (रजिस्टर) लिहिण्याची गरज नाही. पण प्रत्यक्षात दोन्हीपण गोष्टी आम्हाला कराव्या लागत असल्याचे, अंगणवाडी सेविका शितल भालशंकर सांगत होत्या.

अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या काळात दिलेले मोबाईल लगेच खराब झाले. त्यानंतर शासनाकडून मोबाईल मिळाले नाहीत. यासाठी आंदोलने केल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मोबाईलचा वापर सुरू केल्यानंतर नोंदवहीमध्ये नोंदी ठेवण्याची गरज नसल्याचे सुरुवातीला प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

मात्र, अंगणवाडी सेविकांना सध्या जवळपास सोळा प्रकारच्या नोंदवह्यां (रजिस्टर) मध्ये नोंदी ठेवाव्या लागत आहेत. अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन व उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. त्याबरोबरच स्वतःच्या मोबाईलमध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या कार्डच्या साहाय्याने पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर ही माहिती अद्ययावत करत आहेत.

सध्या अंगणवाडी सेविका स्वतःच्या मोबाईलमध्ये माहिती भरत आहेत. नोकरी जाईल या भीतीने स्वतःचाच मोबाईल वापरून ऑनलाईन नोंदी ठेवत आहेत. आम्ही याच्याविरूद्ध वारंवार आवाज उठवला आहे. शासनाने अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मोबाईल उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

रजनी पिसाळ, जिल्हा सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना

हेही वाचा

Pune News : ससून रुग्णालयात उपचारांअभावी मरणयातना!

जात प्रमाणपत्रास उशीर झाल्याने प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जाजरकोट आणि रुकुममध्ये बचावकार्य सुरूच

Back to top button