सोलापूर: टाकळी सिकंदर येथील स्मशानभूमीत जादूटोणा, करणीचा प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर: टाकळी सिकंदर येथील स्मशानभूमीत जादूटोणा, करणीचा प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा : मुलाला शिव्या, शाप का दिल्या म्हणून जाब विचारल्याच्या कारणावरून तसेच गावातील इतर लोकांवर असलेला राग मनात धरून फिर्यादीसह गावातील लोकांचे फोटो वापरून त्या फोटोवर त्यांचे धंदे चालू नयेत, त्यांच्या टपरीचे गिऱ्हाईक बंद होऊन ते गिऱ्हाईक स्वतःच्या टपरीकडे यावे, असे लिहून ते फोटो जाळून एका टोपलीत भरले. त्यात मांस व जादूटोण्याच्या इतर वस्तू ठेवून अनिष्ट, अघोरी, करणी, धरणी, जादूटोणा केल्याचा प्रकार बुधवारी (दि.१५) रात्री ९ च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील स्मशानभूमीत उघडकीस आला.

याबाबची तक्रार एका महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये मनिषा बबन खांडेकर व ज्ञानेश्वर लोंढे (दोघेही रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) यांच्यावर गुरुवारी (दि.१६ ) गुन्हा दाखल केला आहे.

टाकळी सिकंदर येथील स्मशानभूमीतीव नेमका प्रकार काय ?

  • लोकांचे फोटो ठेवून ते जाळण्यात आले.
  • फोटोंच्या मागील बाजूस त्यांचे व्यवसाय, धंदे चालू नयेत, असे लिहिले.
  • फोटो जाळून मांस व इतर पदार्थ, बाहुली, अंडी, लिंबू, लिंबूला टाचण्या टोचून ठेवल्या
  • मोहोळ पोलिसांनी मनिषा खांडेकर व ज्ञानेश्वर लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सिद्धेश्वर परबतराव (वय ४०) कुटुंबासमवेत टाकळी सिकंदर येथे राहतात. सीमा यांच्या मुलाने मनीषा खांडेकर हिला दारूच्या नशेत शिव्या दिल्यानंतर भांडण झाले होते. त्यावेळी खांडेकर हिने त्याला शिव्या, शाप दिला होता. दरम्यान, सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले होते. त्यानंतर सीमा यांनी मनिषा हिला तू जादूटोणा व करणी-धरणी केल्यामुळेच माझ्या मुलाने जीवन संपविले. असे म्हणत जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता.

गावातील दोन तरुणांनी दिली धक्कादायक माहिती

दरम्यान, बुधवारी (दि.१५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गावातील दोन तरुणांनी येऊन फिर्यादी सीमा यांना माहिती दिली की, टाकळी सिकंदर येथीलच मनिषा खांडेकर हिने तिचा साथीदार ज्ञानेश्वर लोंढे याच्यासह मिळून गावातील स्मशानभूमीत सीमा यांच्यासह इतर लोकांचे फोटो ठेवून ते जाळत आहेत. त्याची खात्री करण्यासाठी फिर्यादी व इतर लोक स्मशानभूमीत गेले असता, फोटोंच्या मागील बाजूस त्यांचे व्यवसाय, धंदे चालू नयेत, त्यांचे गिऱ्हाईक बंद होऊन ते स्वतःच्या टपरीकडे यावे. व इतर कारणे फोटोमागे नमूद करून ते फोटो जाळून मांस व इतर पदार्थ यात बाहुली, अंडी, लिंबू, लिंबूला टाचण्या टोचून, भात, दारूची बाटली, हळद-कुंकु, पान-सुपारी अशा वस्तू टोपल्यात ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सीमा यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून मोहोळ पोलिसांनी मनिषा खांडेकर व ज्ञानेश्वर लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अशा अंधश्रद्धातून लोकांची होणारी पिळवणूक व अनिष्ट प्रथा बंद व्हाव्या समाज सुधारावा विज्ञाननिष्ठ व्हावा म्हणून प्राणाची बाजी लावली त्यांना जीव गमवावा लागला. एकवीसाव्या शतकात ही अशा अनिष्ट व अघोरी प्रथांवर लोक विश्वास ठेवत आहेत.

– सुधाकर काशीद, सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (राज्य कार्यकारिणी)

लोकांच्या अशिक्षितपणाचा आणि श्रध्देचा फायदा उठवणारे बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिकांचा सर्व्हे पोलिसांनी करून त्यांचे प्रबोधन करावे. जादूटोणा, करणी -भानामती असा कोणताही प्रकार नसतो. त्यातून होणारी लोकांची लूट थांबवावी.

– ॲड. गोविंद पाटील, महाराष्ट्र अंनिस, राज्य कार्यकारिणी सदस्य

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news