Pimpri News : मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर महामोर्चा | पुढारी

Pimpri News : मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर महामोर्चा

पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. 2) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निगडी येथील तहसील कार्यालयावर निषेध महामोर्चा काढण्यात आला.
शहरातील खासदार, आमदार यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी. अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी भूमिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी घेतली.

मराठा आरक्षणाबाबतची मागणी मान्य होणार नसेल तर खासदार, आमदार यांनी राजीनामे देण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष (अजित पवार गट) अजित गव्हाणे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते एकनाथ पवार, कामगार नेते काशिनाथ नखाते, माजी नगरसेवक राहुल कलाटे, सचिन चिखले, विनायक रणसुभे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, शमीम पठाण, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, प्रकाश जाधव, सतीश काळे, धनाजी येळकर-पाटील, नकुल भोईर, सुनिता शिंदे, कल्पना गिड्डे, मीरा कदम आदी उपस्थित होते.

तहसीलदारांना दिले निवेदन

येथील खंडोबा माळ चौकात दिनकर दातीर-पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून मोर्चाला सुुरुवात झाली. पुणे-मुंबई महामार्गाने बजाज अ‍ॅटोमार्गे हा मोर्चा निगडीतील टिळक चौक येथे आला. येथे काही काळ घोषणाबाजी केल्यानंतर निगडीतील तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा आल्यानंतर सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना निकम यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या

मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून कायमस्वरुपी टिकाऊ आरक्षण द्यावे.
जातीनिहाय जनगणना करावी.
मराठा आरक्षण आंदोलकांवर आजवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या.

हेही वाचा

Lalit Patil Drug Case : चौकशीसाठी ललितची पुन्हा नाशिकवारी

Nashik News : शैक्षणिक पात्रता नसतानाही पदोन्नती; टोकडेतील शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा

Pimpri News : प्रकल्पाचे गाडे पुढे सरकेना

Back to top button