Pimpri news : जलतरण तलाव शुल्कवाढीचा नागरिकांना फटका | पुढारी

Pimpri news : जलतरण तलाव शुल्कवाढीचा नागरिकांना फटका

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील जलतरण तलावासाठी वाढविण्यात आलेल्या शुल्काचा फटका नागरिकांना बसत आहे. तिमाही शुल्कात तिप्पट तर, वार्षिक शुल्कात चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. पोहण्यासाठी येणार्या नागरिकांकडून महापालिका एवढे शुल्क आकारत असेल तर, सर्वसामान्यांनी पोहायचे कोठे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या वतीने 12 वर्षावरील व्यक्तींना जलतरण तलावासाठी देण्यात येणार्या तिमाही पाससाठी पूर्वी जीएसटीसह 472 रुपये इतके शुल्क आकारले जात होते.

तर, नागरिकांना कपडे व अन्य वस्तू ठेवण्यासाठी देण्यात येणार्या लॉकरसाठी पूर्वी 59 रुपये इतके शुल्क आकारले जात होते. जुन महिन्यापासून महापालिकेने शुल्क वाढ लागू केली आहे. नवीन शुल्कवाढीनुसार सध्या 1200 रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. त्याशिवाय, लॉकरचे शुल्क म्हणूनदेखील तिमाही 300 रुपये घेतले जात आहेत.

खेळाडू, अधिकारी व कर्मचार्‍यांना सवलत

12 वर्षाखालील मुले, महापालिका अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक (60 वर्षावरील) यांना मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक शुल्कामध्ये सर्वसाधारण शुल्काच्या 50 टक्के इतकी सवलत दिलेली आहे. दैनंदिन गेस्ट तिकीटमध्ये मात्र, ही सवलत नाही. महापालिका सदस्य, खेळाडू दत्तक योजनेतील जलतरण खेळाडू, महापालिका शाळेतील विद्यार्थी खेळाडू, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग नागरिक यांना विनामूल्य पोहण्याची सवलत मिळत आहे.

शुल्कवाढीने नागरिक हैराण

जलतरण तलावात पोहण्यासाठी एक तुकडी 45 मिनिटांची असते. त्यासाठी पूर्वी दहा रुपये शुल्क होते. आता दररोज वीस रुपये इतके शुल्क नागरिकांना मोजावे लागत आहे. वार्षिक शुल्कात तर चौपट वाढ झाली आहे. पूर्वी वार्षिक शुल्क 500 रुपये आणि 90 रुपये जीएसटी आकारले जात होते. सध्या 4 हजार 500 रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येत आहे. पूर्वी लॉकरसाठी 118 रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येत होते. सध्या लॉकरसाठी वार्षिक 1200 रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

महापालिकेच्या जलतरण तलावांवर पूर्वी माफक शुल्क आकारले जात होते. मात्र, सध्या वाढविलेले दर हे सर्वसामान्य घरातील नागरिकांना परवडणारे नाही. ते एवढे शुल्क कसे देणार? महापालिकेने हे शुल्क कमी करायला हवे.

– गणेश काटे, नागरिक.

हेही वाचा

शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण त्वरित द्या : आ.कानडे

नगर-सोलापूर मार्गावर धुळीचे साम्राज्य

केरळमधील एर्नाकुलममध्ये प्रार्थना सभेदरम्‍यान स्‍फोट, एक ठार, अनेक जखमी

Back to top button