पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज (दि.२९) सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत एक जण ठार झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. ( Blast At Convention Centre In Kerala )
कळमसेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले होते. यावेळी हा स्फोट झाला. पहिला स्फोट सकाळी नऊच्या सुमारास झाला. पुढच्या काही मिनिटांत एकामागून एक स्फोट झाले.
या तीन दिवसीय प्रार्थना सभेचा रविवारी शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा प्रार्थना सभेत सुमारे दोन हजार लोक जमले होते. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज के यांनी सांगितले की, सर्व रुग्णालयांना सतर्क केले आहे. रजेवर गेलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.( Blast At Convention Centre In Kerala )
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, "ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही या घटनेशी संबंधित माहिती गोळा करत आहोत. सर्व अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस महासंचालकांशी बोलणे झाले आहे. तपासासंदर्भात अधिक माहिती गोळा करत आहोत.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, " स्फोटात जखमी झालेल्या ५२ लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 18 आयसीयूमध्ये आहेत आणि 6 जण गंभीर जखमी आहेत. यामध्ये १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. उर्वरित जखमी अन्य खाजगी रुग्णालयात आहेत. स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.