गटारातील गाळ काढण्यास सुरुवात; धायरीकरांमध्ये समाधान | पुढारी

गटारातील गाळ काढण्यास सुरुवात; धायरीकरांमध्ये समाधान

धायरी : पुढारी वृत्तसेवा : अनेक महिन्यांपासून धायरी येथील खडक चौकातील गटार तुंबल्याने सांडपाणी उघड्यावरून वाहत होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेते महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने या गटारातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खडक चौकात गटार तुंबल्याने सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांना मलेरिया, हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही गटारे धारेश्वर मंदिर रस्त्यापासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, खडक चौक, स्मशानभूमीपासून येथील ओढ्याला मिळाली आहेत.

भूमिगत केलेल्या गटारांची साफसफाई करणे कर्मचार्‍यांना अवघड होऊन बसले आहे. उघड्यावरून वाहणार्‍या सांडपाण्याबाबत दै. ‘पुढारी’ने ‘धायरीत ड्रेनेजचे मैलापाणी उघड्या गटारात’ या शीर्षकाखाली नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मलनिस्सरण विभागाचे कार्यकारी अभियंता ललित बेंद्रे आणि निशिकांत छापेकर यांनी या गटारातील गाळ काढण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक आयुक्त संदीप खलाटे व मलनिस्सारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रियंका महाले फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटारातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button