सायबर फ्राॅडमध्ये वाढ! सायबर ठगांच्या ट्रॅपमध्ये गमावले तब्बल एक कोटी

सायबर फ्राॅडमध्ये वाढ! सायबर ठगांच्या ट्रॅपमध्ये गमावले तब्बल एक कोटी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रलोभन, बँक खात्याची गोपनीय माहिती, मनी लाँड्रिंगची भीती, टास्क फ्राॅडद्वारे पाच जणांना सायबर ठगांनी आपल्या ट्रॅपमध्ये अडकवून एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. दिवसेंदिवस असे प्रकार वाढीस लागले असून, नागरिक देखील सहज ठगांच्या जाळ्यात अडकताना दिसून येत आहेत. कोणत्याही प्रकारची खात्री न करत ते पैसे हवाली करून बसत आहेत. सुशिक्षित नागरिकांचे जाळ्यात अडकण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. याप्रकरणी गुरुवारी विविध पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. एक कोटी सहा लाख सहा हजार 888 रुपयांची फसवणूक केली आहे.

सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर येथील एकाला संपर्क करून मनी लाँड्रिंगची केस असल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली धाक दाखवून पैसे पाठवायला सांगत, 49 लाख 37 हजारांची फसवणूक केली आहे. तर धानोरीतील एकाला तुमच्या नावाने पार्सल आले असून त्यात अंमली पदार्थ असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी पैसे पाठवायला सांगून 34 लाख 80 हजारांची फसवणूक केली आहे. याचबरोबर सायबर चोरट्यांनी धायरी येथील एकाला प्रीपेड टास्कच्या आमिषाने 11 लाख 21 हजारांची फसवणूक केली आहे. इतर दोघांची सुद्धा याच प्रकारे फसवणूक केली आहे..

मनी लाँड्रिंग केसचा धाक अन् 47 लाख उकळले

फेडेक्स कुरिअर, मुंबई क्राईम ब्रॅंच सीबआयच्या फंड्याने सायबर चोरट्याने शिवाजीनगर येथील एकाची 49 लाख 37 हजार 944 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नामांकित कंपनीत काम करणार्‍या 41 वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी अ‍ॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 21 एप्रिल रोजी मुंबई कस्टममधून बोलत असल्याचे सांगून मुंबई ते थायलंड जाणार्‍या फेडेक्स पार्सलमध्ये पाच पासपोर्ट, 3 क्रेडिट कार्ड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज, 4 किलो कपडे, 1 लॅपटॉप सापडले आहे.

यानंतर फिर्यादी यांना स्काईप आयडीवरून संपर्क करून मुंबई क्राईम ब्रॅंचमधून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर आधारकार्ड नंबर सांगून हा नंबर मनी लाँड्रिंगसाठी वापरात आला आहे. यानंतर सायबर चोरट्याने हे प्रकरण गंभीर असून याचा तपास सीबीआयचे अधिकारी करतील अशी भीती फिर्यादी यांना दाखवून पुढच्या काळात तुम्ही कुठे कुठे फिरायला जाणार असल्याची माहिती विचारली. यानंतर बँक खात्यातील पैसे सरकारकडे पाठवून संशोधन करावे लागेल असे सांगून अवघ्या तीन दिवसात 49 लाख 37 हजार 944 रुपये विविध बँक खात्यांवर पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल कुलकर्णी तपास करत आहेत.

अमली पदार्थाचा धाक

याचप्रमाणे धानोरी येथील एकाला कुरियरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून 34 लाख 80 हजार 629 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार्यालयात बसले असताना सायबर चोरट्याने फोन करून विक्रमसिंह बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्या नावाने जॉर्ज मॅथ्यूज यांनी पार्सल पाठवले असून त्यात अंमली पदार्थ आहेत. याचबरोबर तुमच्या नावाने काही खोटे बँक खाते काढून मनी लाँड्रिंगमध्ये त्याचा वापर झाला आहे. अटक टाळण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने फिर्यादी यांना 34 लाख 80 हजार 629 रुपये पाठवायला लावून फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक खंदारे करत आहेत.

टास्कद्वारे 11 लाखांची फसवणूक

दुसर्‍या एका प्रकरणात सायबर चोरट्यांनी धायरी येथील एकाला प्रीपेड टास्कचे आमिष दाखवून 11 लाख 21 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चिन्मय गणेश पुपाला (वय-36, रा. धायरी) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी यांना फोन करून कमाईचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळे प्रीपेड टास्क देऊन ते पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पैसे पाठवायला सांगून 11 लाख 21 हजार 615 रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच

विश्रांतवाडी येथे राहणार्‍या 31

वर्षीय तरुणाची टास्कच्या आमिषाने 5 लाख 51 हजार 536 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बँकेतून बोलण्याचा बहाणा

केवासी अपडेट करण्याच्या बहाण्याने 64 वर्षीय महिलेची 5 लाख 15 हजार 164 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी माणिकबाग येथे राहणार्‍या महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेला फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर केवासी अपडेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करायला लावून फसवणूक केली आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंभार करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news