pune news : औषध खरेदीवर ‘एफडीए’ची नजर | पुढारी

pune news : औषध खरेदीवर ‘एफडीए’ची नजर

पुणे : पुढारी वृत्तसेवा; सध्या महाराष्ट्रातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून इतर राज्यांतून औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत आणि अन्न औषध प्रशासनाला (एफडीए) माहिती न देता त्याची विक्री केली जात आहे. यामुळे बनावट औषधे बाजारात येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर राज्यांतून खरेदी केलेल्या औषधांवर आता एफडीएची करडी नजर राहणार आहे.
बनावट औषधांवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने इतर राज्यांतून खरेदी केलेल्या आणि महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या औषधांच्या नोंदींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एफडीएने पत्र प्रसिध्द केले केले. सर्व औषध विक्रेत्यांनी इतर राज्यांतून खरेदी केलेल्या औषधांच्या नोंदी दररोज अपडेट करा, अशा सूचना दिल्या आहेत.
औषधविक्रेत्यांनी एक स्वतंत्र ई-मेल आयडी तयार करुन त्यावर बिलांसह इतर राज्यांमधून खरेदी केलेल्या औषधांच्या दैनंदिन नोंदी अधिकार्‍यांना सादर कराव्यात. नोंदी आणि औषधांची एफडीएकडून पडताळणी केली जाईल आणि अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल, असे एफडीएच्या अधिका-यांनी सांगितले.
किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना दररोज नोंदी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पुण्यात बनावट औषधे सापडल्याच्या घटनांमध्ये ही सर्व औषधे परराज्यातून खरेदी करण्यात आली होती. पुण्यात या वर्षाच्या सुरुवातीला बनावट औषधांच्या तपासण्यांमध्ये गुजरात, राजस्थान आणि बिहार राज्यांमध्ये जाऊन शहानिशा करावा लागला. प्रत्यक्षात, औषधे विकणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले होते.
– एस व्ही प्रतापवार, 
सहआयुक्त, एफडीए (पुणे विभाग)
हेही वाचा

Back to top button