अजित पवारांनी वाचले थेट शिक्षण विभागाचे ‘रेट कार्ड’ | पुढारी

अजित पवारांनी वाचले थेट शिक्षण विभागाचे ‘रेट कार्ड’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागाच्या कामाबद्दल मी अतिशय असमाधानी असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत थेट या विभागाचे कामासाठी ठरलेले ’रेट कार्ड’ वाचून दाखविले. शाळांच्या स्वमान्यतेसह कोणतेही काम फाईलवर वजन ठेवल्याशिवाय होतच नाही, अशी या विभागाची अवस्था आहे, असेही या बैठकीत अजित पवार कडाडले. शाळांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही, तर शाळांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी काढल्या जात आहेत. शिक्षण विभागातील गैरकारभार वेळीच थांबवा; अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराच पवार यांनी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना दिला.

जिल्हा परिषद मुख्यालयात शनिवारी आढावा बैठकीत पवार बोलत होते. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शालिनी कडू, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले की, शिक्षण विभागात भ—ष्टाचार बोकाळला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण आयुक्त यांनी यामध्ये लक्ष घालावे. स्वमान्यता तसेच ’आरटीई’च्या शाळांना शुल्कप्रतिपूर्ती देण्यासाठीदेखील शिक्षण विभागाकडून अडवणूक होते.
विविध कारणे सांगून हेलपाटे मारायला लावले जात आहे.शिक्षण विभागावर संतापलेल्या पवार यांनी पानशेत येथील समूहशाळा उपक्रम राबविल्याचे कौतुक केले.

लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल घेत जा

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध कामांसाठी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतात, त्याची साधी दखलही घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या या तक्रारीवर अजित पवार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची एकत्र बैठक बोलाविण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घेत जा, अशी सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा

Ajit Pawar : अजित पवारांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची हजेरी

Pune News : बारामतीत पुन्हा विमान कोसळळे

Tej Cyclone : ‘तेज’चे आज महाचक्रीवादळात रूपांतर

Back to top button