सांगा आम्ही जगायचं कसं ? शिरूरच्या बेट भागात दिवसा समूहाने फिरतात बिबटे | पुढारी

सांगा आम्ही जगायचं कसं ? शिरूरच्या बेट भागात दिवसा समूहाने फिरतात बिबटे

आबाजी पोखरकर

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, पूर्वी एकटा फिरणार्‍या बिबट्याचे आता दिवसा सामूहिक दर्शन होत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनामुळे पशुधन धोक्यात आले आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी शेतात बिनधास्त फिरणार्‍या शेतकर्‍यांना आता बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी सोडाच, परंतु दिवसा शेतात फेरफटका मारणे मुश्कील झाल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. शेतकरी, लहान मुले, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने ‘…सांगा आम्ही जगायचं कसं?’ असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

बेट भागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी व घोड नदीच्या मुबलक पाण्यामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर, टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे आदी गावांत उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या उसाच्या लपणचा फायदा उठवत गेले 12 वर्षांपासून या परिसरात बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेळ्या-मेंढ्या, गाय, वासरू, घोडी, कुत्रा या प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. बिबट्याच्या वारंवार हल्ल्याच्या घटनेने आता अनेक शेतकरी कुत्रा पाळायचे बंद झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्या झाल्याने घटना घडूनही वेळेत पंचनामे होत नाही. वनविभागाकडूनही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपरखेड येथे बिबटे थेट दारात येत असल्याने कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा जीव मुठीत धरून शेतात पिकांना पाणी देताना, काम करताना अचानक समोर बिबट्याच्या दर्शनाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा अनुभव दररोज अनेक शेतकर्‍यांना येत आहे.

शेतकरी-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी सरकारकडून तत्काळ उपाययोजनाबाबत शेतकर्‍यांकडून होत असलेली मागणी आजही वार्‍यावर आहे. जुन्नर वनविभागाकडून सन 2012 च्या दरम्यान या परिसरात बंगळुरू येथील सीडब्ल्यूएस या वन्यजीव संशोधन संस्थेच्या माध्यमातून पिंपरखेड आणि काठापूर परिसरात 16 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. यामध्ये बिबट्या, तरस या वन्यप्राण्यांची छायाचित्रे कैद झाली होती. त्यानंतर आजपर्यंत येथील बिबट्यांची संख्या आणि हल्ले दिवसेंदिवस वाढतच गेले आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने वनविभागाने या परिसरात नव्याने सर्वेक्षण करून बिबट्याची गणना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Back to top button