पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची तीव्रताआखी वाढली आहे. दरम्यान इस्रायलकडून हवाई हल्ल्यानंतर आता भूहल्ल्याची तयारी केली जात असल्याचे, युद्धजन्य स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता इस्रायल सैन्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरात खबरदारी घेतली जात आहे. देशासह राज्यातही ज्यू धर्मीयांची प्रार्थनास्थळे अन् वस्तीमधील सुरक्षा वाढवली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रतील रायगड, मुंबई शहरात देखील ज्यू धर्मियांची वस्ती, प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, सुरक्षेत देखील वाढ केली आहे. (Israel-Hamas War )
रायगड;जयंत धुळप: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्शभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्यू धर्मीयांच्या सिनेगॉग प्रार्थना स्थळांना पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्यू लोकवस्थी असलेल्या परिसरात पोलिस गस्त घालत आहेत, अशी माहिती रायगडचे अपर जिल्हा पोलिस अधिक्षक अतूल झेंडे यांनी 'दैनिक पुढारी' शी बोलताना दिली आहे. (Israel-Hamas War)
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण आणि रेवदंडा येथे ज्यू समाजाची प्रार्थना स्थळे आहेत. तर अलिबाग शहरात इस्त्रायल आळी, पेण शहरात इस्त्रायल आळी, रेवदांडा जवळ थेरोंडा, अलिबागजवळ थळ आणि मुरुड तालुक्यांत बोर्ली व नावगांव येथे ज्यू समाजीची वस्ती आहे. या सर्व ठिकाणी पोलिस गस्त सुरु करण्यात आल्याचे झेंडे यांनी पुढे सांगितले.
दरम्यान रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ज्यू बांधवांचे येथील अन्य समाज बांधवांसी अत्यंत सलोख्याचे नाते असून, इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रार्थना सर्व समाज बांधव करीत आहेत.