पुणे : गुरुजी शाळेत दिसले, विद्यार्थी खुदकन हसले! | पुढारी

पुणे : गुरुजी शाळेत दिसले, विद्यार्थी खुदकन हसले!

पुणे : शाळा सुरू झाल्यापासून आपल्याला शिकविणारे शिक्षक कोठे आहेत, आपल्याला दुसर्‍या वर्गात का बसवले जातेय, एकाच बेंचवर दाटीवाटीने तसेच जमिनीवर का बसावे लागतेय असा मागील चार दिवसांपासून प्रश्न पडणार्‍या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 9) दिलासा मिळाला. अनामत रक्कम व थकलेले वेतन सात दिवसांत जमा करण्याच्या आश्वासनानंतर महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कंत्राटी शिक्षकांनी पुन्हा कामावर रुजू होत विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. पाच दिवसांनंतर आपले आवडते शिक्षक पुन्हा दिसल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला.
दरम्यान, दै. पुढारीने याबाबत पालकांची बाजू मांडणारे ’पालिकेच्या शाळेत टाकलं हेच चुकलं का?’ असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर शिक्षकांनी आपली भूमिका बदलून पुन्हा अध्यापनाचे कार्‍य सुरु केले आहे. जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील कंत्राटी शिक्षक बुधवार (दि. 4) पासून सामूहिक सुटीवर गेले होते. थकीत वेतनाबाबत दोनदा आश्वासनानंतरही प्रशासनामार्फत कोणतीच कार्यवाही न झाल्याने शिक्षकांनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये, शहरातील महापालिकेल्या जवळपास 54 प्राथमिक शाळांमधील 166 कंत्राटी शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या या पावित्र्यामुळे ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे वेळापत्रकच बिघडले होते. अखेर, प्रशासनाने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सात दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षक पुन्हा कामावार रुजू झाले. दरम्यान, प्रशासनाने तिसर्‍यांदा आश्वासन दिले असून, सात दिवसांच्या आत वेतन न जमा झाल्यास शिक्षकांकडे सामूहिक राजीनाम्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, असेही सांगण्यात आले.
प्रशासनाने रखडलेला वेतन प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात तत्परता दाखवली.  सात दिवसांच्या आत वेतन करण्यात येणार असून, शाळेमध्ये जाण्याचे आवाहन केले होते. याखेरीज, शाळेतील अन्य सहकारी शिक्षकांवर येणारा ताण व परीक्षांचा कालावधी जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे, कंत्राटी शिक्षकांनी पुन्हा काम करण्यात सुरुवात केली आहे.
– प्रवीण खेडकर, 
कंत्राटी शिक्षक.
वेतन रखडल्याने शिक्षकांचे, तर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर शाळेत रुजू झालो आहे. प्रशासनानेही आश्वासनानुसार वेळेत वेतन जमा करावे तसेच पुढे या स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिक्षकांना आंदोलनापेक्षा शिकविण्यात जास्त रस आहे.
– नितीन सुपेकर, कंत्राटी शिक्षक.
काही प्रशासकीय कारणांमुळे कंत्राटी पध्दतीने भरलेल्या शिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया रखडली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुरुवारपर्यंत (दि. 12) सर्व शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येईल.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका.
हेही वाचा

Back to top button