कोल्‍हापूर : मनसेचे किणी टोल नाक्‍यावरील आंदोलन स्‍थगित | पुढारी

कोल्‍हापूर : मनसेचे किणी टोल नाक्‍यावरील आंदोलन स्‍थगित

किणी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किणी टोल नाक्यावर करण्यात येणारे आंदोलन आज स्थगित करण्यात आले. वरिष्ठांचा पुढील आदेश आल्यानंतरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.

मुदत संपूनही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणाने टोल वसुली सुरू आहे. यापूर्वी मनसेने लोकशाही मार्गाने आंदोलने करूनही हे टोल नाके बंद करण्यात आले नाहीत. यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर टोल विरोधी आंदोलन करण्यात येणार होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी येथील टोल नाक्यावर सकाळी ११ वाजता जिल्हाभरातील मनसे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत टोल नाक्यावरील आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान किणी टोल नाक्यावर आंदोलनकर्ते येणार म्हणून सकाळपासूनच टोल नाका परिसरात वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरव तळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलन स्थगित झाल्याने पोलिसांनीही बंदोबस्त काढुन घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत राज्यभरात दोन तीन व चार चाकी वाहनांना टोल माफ करण्यात आल्याचे सांगितले. ही चित्रफीत अनेक वाहनधारक टोल कर्मचाऱ्यांना दाखवून वाहने टोल फ्री सोडण्याची मागणी करत असल्याचे चित्र टोल नाक्यावर दिसत होते.

हेही वाचा : 

Back to top button