Pune Metro : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे 35 टक्के काम पूर्ण | पुढारी

Pune Metro : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे 35 टक्के काम पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माण -हिंजवडी ते शिवाजीनगर-पुणे मेट्रो मार्गिका-3 मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाबाबत आयोजित आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यात ही माहिती देण्यात आली. बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे आयटीसीटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढेल. त्यादृष्टीने स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा करण्यात यावी व मेट्रो सेवेला जोडणारी बससेवा प्रवाशांना उपलब्ध करुन द्यावी. हा मेट्रोमार्ग सतत वाहनांची वर्दळ असणार्‍या भागातून जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर होण्यासही मदत होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मेट्रो मार्गिका उभारणीतील अडथळे दूर करून हा मार्ग अधिक लवकर पूर्ण होईल, असे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. शासनस्तरावर मेट्रो मार्गिकेसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वेळेची बचत होणार
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग सुमारे 24 किलोमीटर लांबीचा असून, या मार्गिकेत 23 स्थानके आहेत, त्यापैकी 16 स्थानकांचे काम सुरू आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मार्गिकेच्या परिसरात दररोज 14 लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर व सिव्हिल कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोच्या सेवेद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. प्रवासाचा एकूण वेळ केवळ 35 मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकेल.

हेही वाचा :

Back to top button